Join us  

डंपिंग ग्राऊंडसाठी पाठपुरावा करा

By admin | Published: May 26, 2014 4:39 AM

येथील ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा सरपंच शुभांगी गोंधळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकतीच पार पडली

रेवदंडा : येथील ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा सरपंच शुभांगी गोंधळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकतीच पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. गावाची वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण पाहाता गावाला डंपिंग ग्राऊंड अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे एखादा भूखंड मिळविण्यासाठी एखादी समिती नेमून पाठपुरावा करावा असे नागरिकांनी सुचविले. किनार्‍यावर मातीची धूप थांबविण्यासाठी शासनाने बंधारा बांधला. त्यावर काहींनी झोपड्या बांधल्या असून त्या अनधिकृत ठरवून कारवाई करावी. रेवदंडा गावाला हरेश्वर मैदान हे एकमेव असून त्यावर झालेली अतिक्रमणे काढण्यात यावी अशी मागणी मागील ग्रामसभेत करण्यात आली. त्यावर कारवाई काय झाली असा प्रश्न उपस्थितांनी केला. रेवदंडा बाजारपेठेत अरूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी वारंवार होत असते. त्यासाठी रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. व्यापारीवर्गांनी दुतर्फा जागा देण्याचे या अगोदरच काही वर्षापूर्वी बांधकाम खात्याला कळविले आहे. त्याचा पाठपुरावा करावा. नवीन इमारतींना दोन मजल्यांपर्यंतच ग्रामपंचायती भागात परवानगी असताना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी, भविष्यात याच इमारतीतील सांडपाणी जाण्यासाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. या दृष्टीकोनातून भविष्यात ड्रेनेज पद्धतीचा अवलंब टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायतीने करावा, अशी मागणी करण्यात आली. २०१३-१४ या आर्थिक वर्षाचा जमाखर्च हा नागरिकांना सांगण्यात आल्यावर ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढवण्यासाठी उपहारगृहे व अन्य दुकानदार यांचा कर अल्प असून तो वाढवावा तसेच व्यवसायाची उलाढाल बघून उपाहारगृहांना कर आकारावा अशी मागणी करून ग्रामसभेत मांडलेले ठराव व त्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकार्‍यांनी घ्यावी असे नागरिकांनी सूिचत केले. ग्रामसभेला उपसरपंच मंदा माळी यांनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)