मुंबई : बकरी ईद निमित्त सरकारी निर्देशांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन इंडियन मुस्लिम फॉर डेमोक्रेसीतर्फे करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने लॉकडाऊन कालावधीत बकरी ईद साजरी करताना काळजी घ्यावी आवश्यक त्या उपाययोजना करुन सरकारी निर्देशांचे पालन करुन इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ईदची नमाज घरातच अदा करावी. प्रशासनाने परवानगी दिलेल्या ठिकाणीच कुर्बानी करावी. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, कुर्बानीमुळे कोणतीही अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन संघटनेतर्फे प्रा. फारुख वारिस, इरफान इंजीनियर, शाईन सय्यद, मुख्तार हुसैन, डॉ फरहत खान, सुहैल मसूद, अँड अश्रफ अहमद शेख, फिरोज पटेल, नुझहत फारुकी, आदम भुसावळवाला, रफिक शेख, डॉ निखत नौमान आदींनी केले आहे.
ऑल इंडिया जमैतुल कुरैशचा विरोध : ऑल इंडिया जमैतुल कुरैशचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान कुरैशी यांनी सरकार च्या निर्देशांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने बकरे खरेदी ऑनलाईन पध्दतीने करायला सांगितली आहे मात्र बकरे हे ऑनलाईन पध्दतीने खरेदी करण्यासाठी बकरे हे काही इलेक्ट्रॉनिक्स गँजेटस नाहीत अशी टीका त्यांनी केली. सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे हजारो प्राणी विक्रेते मोठ्या आर्थिक संकटात पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बकरी ईद हा या व्यापाऱ्यांच्या दृष्ट्रीने व्यवसायाची वर्षातला सर्वात चांगला हंगाम असतो. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात असलेले विक्रेते या निर्णयामुऴे कोलमडून पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा व व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कुरैशी यांनी केली आहे.