सहा सुवर्ण नियम पाळा, सर्पदंश टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:04 AM2021-06-21T04:04:57+5:302021-06-21T04:04:57+5:30
मुंबई : पावसाळ्यात साप मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना मुंबईकरांना नव्या नाहीत. इथल्या झोपडपट्ट्या, गटार वा नाल्यालगतच्या परिसरात वसंत ऋतूत ...
मुंबई : पावसाळ्यात साप मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना मुंबईकरांना नव्या नाहीत. इथल्या झोपडपट्ट्या, गटार वा नाल्यालगतच्या परिसरात वसंत ऋतूत सर्पदर्शन होत असते. पण स्वतःचे सुरक्षित वास्तव्य सोडून साप माणसांच्या वस्तीत का येत असतील, साप दिसल्यास काय करावे, सर्पदंश टाळण्याच्या उपाययोजना कोणत्या, साप विषारी आहे की बिनविषारी हे कसे ओळखावे, या व अशा अनेक प्रश्नांवर सर्पमित्र भरत जोशी यांच्याशी साधलेला संवाद...
......
- साप मानवी वस्तीत का शिरतात?
सापांचे वास्तव्य हे प्रामुख्याने बिळे आणि दगडांमधील फटीत असते. पावसाळ्यात त्यात पाणी शिरले की साप सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न करतात. मानवी वस्तीलगत खाद्य (उंदीर आणि बेडूक) मुबलक उपलब्ध असल्याने तेथे अडगळीची जागा शोधून निवारा बनवतात. भक्ष्याच्या शोधात बाहेर पडला की साप माणसांच्या निदर्शनास येतो. अशावेळी आपण जितके घाबरतो त्याच्या दहापट अधिक साप घाबरतो आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करतो. या दरम्यान सर्पदंश होण्याची सर्वाधिक शक्यता असते.
- सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे?
साप आपल्या घरानजीक येऊ नये, याची काळजी घेतल्यास सर्पदंश होण्याची शक्यता टाळता येईल. त्यासाठी मी सहा सुवर्ण नियम सांगेन. १) घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा. घुशींनी बिळे तयार केली असल्यास दगडांच्या सहाय्याने ती बुजवून टाका. दारामध्ये फटी असतील तर त्या मिटवा. २) अंधारात अनोळखी जागा, पाणवठा किंवा जंगलात जात असाल तर बॅटरी आणि काठी सोबत ठेवा. ३) जंगलातून फिरताना झाडांवरील सापांपासून बचाव करण्यासाठी टोपीचा वापर करा. ४) अडगळीच्या खोलीची सफाई करताना पुरेसा उजेड असावा. ५) समुद्रकिनारी फिरताना बऱ्याचदा सर्प निपचित पडलेले दिसतात. ते मेलेले असल्याचा समज करून त्यांना स्पर्श करू नका. ६) खरकटे घराजवळ टाकू नका, कारण ते खाण्यासाठी येणाऱ्या उंदरांच्या मागावर साप असण्याची शक्यता असते.
- साप विषारी आहे की बिनविषारी हे कसे ओळखावे?
सर्वाधिक हालचाल होणाऱ्या अवयवांना (प्रामुख्याने हात आणि पाय) साप लक्ष्य करतो. सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही खूण नसल्यास तो बिनविषारी सापाचा चावा असेल. विषारी सर्पाने दंश केल्यास ‘यू’ आकाराची खूण किंवा जखम दिसून येईल. अशावेळी तातडीने रुग्णालयात दाखल होण्याची गरज असते. बुवाबाजी किंवा भोंदूगिरीच्या नादी लागून भलतेसलते उपचार करू नयेत. कारण सर्पाचे विष हे मज्जासंस्था आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करते. त्यामुळे काही तासांत मृत्यूचा धोका संभवतो. बिनविषारी सर्पदंश झाल्यास धनुर्वाताचे इंजेक्शन घेणे गरजेचे असते.
(मुलाखत - सुहास शेलार)
..........................................................