(मुलाखत – स्नेहा मोरे)
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ६० वर्षांवरील आणि ४५-५९ वर्षे या वयोगटातील विशिष्ट आनुषंगिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला तेव्हापासून लसीकरण केंद्रांमध्ये लोकांची गर्दी हाेत असल्याचे चित्र आहे. या लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरी प्रशासन व खासगी आरोग्यकर्मी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. मात्र लोकांनीही कोविड-१९ लस घेण्यासाठी जाताना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी जाताना कोणते नियम पाळावेत, काय खबरदारी घ्यावी, याविषयी संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस यांच्याशी साधलेला संवाद....
लस घ्यायला जाण्यापूर्वी कोणते नियम लक्षात ठेवावेत?
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व स्थानिक पालिका यांच्या वेबसाइटवर जाऊन कोणते लसीकरण केंद्र आपल्या घराच्या जास्तीत जास्त जवळ आहे याचा शोध घ्या. आरोग्य सेतू किंवा CO-WIN २.० ॲपद्वारे नोंदणी करा. ४५-५९ या वयोगटातील व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लसीकरण केंद्रावर घेऊन जावे. लसीकरणासाठी कळविण्यात आलेली तारीख आणि वेळेनुसारच केंद्रावर जा. लसीकरण केंद्राने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करा. रांगेत उभे असताना/बसताना इतरांपासून ६ फुटांचे अंतर ठेवा. गर्दी करणे टाळा. तेथील अधिकाऱ्यांना सहकार्य करा. त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास लसीकरण सुरळीत पार पडू शकेल.
लस घेण्यापूर्वी कोणत्या बाबींची खबरदारी घ्यावी?
लसीचा संभाव्य परिणाम, ॲलर्जीविषयी डॉक्टरांशी बोला. सतत मास्क घालून ठेवा. सॅनिटायझरची लहान बाटली स्वत:जवळ ठेवा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. लस घेणे हा काेराेना महामारीशी दोन हात करण्यासाठीचा सर्वात चांगला उपाय आहे, तेव्हा त्याबद्दल मनात संभ्रम बाळगू नका.
लसीचा डोस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?
लस घेतलेल्या व्यक्तींनी मास्क घालणे सोडून देऊ नये. गर्दीच्या ठिकाणी किंवा घरगुती भेटीगाठींच्या कार्यक्रमांना जाणे टाळावे. लस घेतल्यानंतर वेदना, हलका ताप, थकवा इत्यादी सर्वसाधारण दुष्परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे भरपूर द्रवपदार्थांचे सेवन करा. जिथे इंजेक्शन दिले आहे तिथे स्वच्छ, थंड आणि ओल्या कपड्याने पुसून घ्या. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जाणवल्यास डॉक्टरांशी तत्काळ बोला. लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असते. या मधल्या काळात दक्ष राहा आणि आजाराच्या संपर्कात येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. लसीची परिणामकारकता वाढविण्यामध्ये पोषक तत्त्वेही महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या डॉक्टरांशी वेळोवेळी बोलत राहा. दर तीन महिन्यांनी आरोग्याची तपासणी करा. ‘लस घेतली म्हणजे महामारी संपली’ असे होत नाही, ही गोष्ट विसरू नका.
.............................