Join us

वाहतुकीचे नियम पाळा; अन्यथा, तुम्हाला घेऊन जाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:34 AM

विद्यार्थ्यांनी यम आणि चित्रगुप्तच्या वेशात केले प्रबोधन

मुंबई : वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होऊन अनेकांचे बळी जातात. तुम्ही अपघातांचे नियम पाळा; अन्यथा आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, असे यम आणि चित्रगुप्तच्या वेशातील विद्यार्थ्यांनी वाहनचालकांना सांगितले.

राज्यात सध्या रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. ट्रॉम्बे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव घाडगे आणि आरएसपी शाळेचे वार्डन आॅफिसर अमोगसिद्ध पाटील यांच्या वतीने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी यम आणि चित्रगुप्तच्या वेशातील विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाला नियम उल्लंघन तुमच्या जीवावर बेतू शकते. वाहन चालविताना सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर करा, भरधाव वेगात वाहन चालवू नका, मद्यपान करून वाहन चालवू नका, या नियमांचे पालन करा; अन्यथा आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, असे सांगितले. प्रथमेश लोंढे या विद्यार्थ्याने यमाचा तर सुशांत डावरे या विद्यार्थ्याने चित्रगुप्तचा वेष केला होता. या वेळी नारायण आचार्य हायस्कूल, भारतनगर आणि नारायण आचार्य हायस्कूल, माहुल रोड या दोन शाळांतील विद्यार्थ्यांनी आरसी मार्ग शंकर देऊळ ते आशिष सिनेमा अशी जनजागृती फेरी काढली होती. या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार आनंदराव पवार, धनाजी खुस्पे, संदीप वाकचौरे, चेतन कदम, रेवनाथ मुळे आदी उपस्थित होते.

रिक्षा-टॅक्सीचालकांची नेत्र तपासणीवाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत वांद्रे वाहतूक विभागाच्या वतीने रिक्षा, टॅक्सीचालक आणि वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. हे शिबिर १७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सोमवार आणि मंगळवारी २०० हून अधिक जणांची नेत्रतपासणी करण्यात आली.