मराठी विद्यापीठासाठी पाठपुराव्यानंतर समिती; डॉ. सदानंद मोरे अध्यक्षस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 09:36 AM2023-07-12T09:36:13+5:302023-07-12T09:36:40+5:30
समितीत अन्य पाच सदस्यांचा समावेश
मुंबई : अखेर चार महिने सातत्याने स्मरणपत्र, वारंवार पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत एकूण सहा सदस्य आहेत.
या समितीत डॉ. विद्या पाटील, प्रा. राजेश नाईकवडे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव, महाराष्ट्र विधानमंडळ मराठी भाषा समिती अध्यक्ष वा सदस्य आणि उच्च शिक्षण विभाग अमरावती येथील विभागीय सहसंचालकांचा समावेश आहे. समितीने विद्यापीठ स्थापनेसाठी योग्य वाटतील अशा बाबींसाठी विविध तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्था यांच्याशी विचारविनिमय करून त्यादृष्टीने सर्वसमावेशक अहवाल तपशिलासह दोन महिन्यांत शासनास सादर करावयाचा आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि मराठीच्या व्यापक हितासाठी संस्थेचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले, मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी समितीची नियुक्ती व्हावी यासाठी राज्य शासनाच्या संबंधित विभागांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार स्मरणपत्र पाठविण्यात आले. त्याचा पाठपुरावा करण्यात होता.
समितीने विद्यापीठ उभारणीसाठी स्थान, आवश्यक जमीन, बांधकाम आदींच्या दृष्टीने शिफारस करावयाची आहे. तसेच विद्यापीठात अध्यापक व अन्य कर्मचारी किती असावेत, त्यांचा आर्थिक भार राज्यावर किती असेल, विद्यापीठातील विविध विभाग, विद्यापीठाची रचना आदींचा सविस्तर आराखडाही सादर करावयाचा आहे. विद्यापीठामधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी किती उपलब्ध होतील, त्याची शिफारसही सादर करायची आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी मातृभाषेतून शिक्षण, त्याविषयीचा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्याशक्यता, तसेच अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणाचे अभ्यासक्रम मराठीतून शिकवण्यासंबंधातील बाबींचाही व विद्यापीठाचे स्वरूप एकल की अन्य महाविद्यालयांसारखे संलग्न असेल याची माहितीही सादर करावयाची आहे.