कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:21 PM2020-11-26T18:21:18+5:302020-11-26T18:22:42+5:30
Mahaparinirvana Din : आंबेडकरी संघटनांचे एकमताने आवाहन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२०) तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उप आयुक्त प्रणय अशोक, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कसबे, रमेश जाधव, नागसेन कांबळे, भिकाजी कांबळे, रवी गरुड, प्रदीप व प्रतीक कांबळे, सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. हा धोका लक्षात घेऊन मागील ७-८ महिन्यांमध्ये सर्वधर्मीयांनी आपापले सण-उत्सव अत्यंत साधेपणाने आणि एकत्र न येता साजरे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुन अनुयायांनी अभिवादन करावे, अशी नम्र विनंती आहे, असे दिघावकर यांनी नमूद केले.
अनुयायांना येण्यास निर्बंध असले तरी, महापरिनिर्वाण दिनाची प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय पद्धतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असे सांगून दिघावकर म्हणाले की, चैत्यभूमी वास्तू तसेच अशोकस्तंभ, तोरणा प्रवेशद्वार यांची स्वच्छता करुन रंगरंगोटी करण्यात येत आहे. चैत्यभूमी, अशोकस्तंभ, भीमज्योती आदी सर्व ठिकाणी पुष्प-सजावट करण्यात येईल. सोबतच चैत्यभूमी येथे महत्त्वाच्या व्यक्तिंकरिता नियंत्रण कक्ष उभारणी करुन चैत्यभूमी येथे १ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी आणि जल सुरक्षा रक्षक देखील तैनात केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे देण्यात येणाऱया नागरी सेवा-सुविधा यंदा नसतील. उर्वरित तयारी योग्यरित्या आणि विहित वेळेत पूर्ण केली जात आहे. अनुयायांना अभिवादन करता यावे म्हणून चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण देखील केले जाणार आहे, त्याची लिंक सार्वजनिकरित्या दिली जाईल. महापरिनिर्वाण दिनी थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनला देखील विनंती करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त चव्हाण म्हणाले की, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक संकिर्ण-१०२०/प्र.क्र.९०/विशा-१अ अन्वये दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शासनाने देखील सर्व अनुयायांना विनंती केली आहे की, कोरोना संसर्ग लक्षात घेता, सर्वांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून सहकार्य करावे. यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. आपल्यासह सर्वांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे. विविध संघटनांनी आपापल्या स्तरावर जनतेला आवाहन करुन जनजागृती करावी. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलिस देखील स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी संयुक्त आवाहन करतील, असे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली. दरवर्षी राज्यशासन, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलिस आणि इतर शासकीय विभाग देखील महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणावर अनुयायांना सेवा-सुविधा देतात. यंदाची स्थिती वेगळी असून त्यात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. चैत्यभूमी ही आपली सर्वांची जबाबदारी असून निर्बंध हे कोरोना रोखण्यासाठी आहेत. सर्व अनुयायी आपापल्या घरुन अभिवादन करतील, अशी ग्वाही या संघटनांनी दिली.
विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी आवाहन केले की, सर्व अनुयायांनी ‘राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’ असा मजकूर लिहून आपले नांव, पत्ता, जिल्हा नमूद करुन चैत्यभूमी स्मारक, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ येथे पोस्टाने पत्र पाठवून अभिवादन करावे. या उपक्रमास देखील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
गोराई (मुंबई) येथील दि ग्लोबल विपश्यना पॅगोडाही दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली. या कालावधीत पॅगोडा बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित संस्थेने घेतला आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील अनुयायांनी चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता आपापल्या स्थानिक स्तरावर अभिवादन करावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुन्हा एकदा बैठकीच्या अखेरीस करण्यात आले.