कोवीड केअर सेंटर पाठोपाठ खाजगी रुग्णालयातही बेडसची कमतरता, आयसीयुचे बेड झाले फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 03:24 PM2020-07-08T15:24:20+5:302020-07-08T15:25:05+5:30
महापालिकेने वेबसाईटवर शहरातील कोवीड रुग्णालयात सध्यस्थितीत बेड किती उपलब्ध आहेत, याची आकडेवारी जाहीर केली आहे. यामुळे रुग्णाला कोणत्या रुग्णालयात अॅडमीट व्हायचे याची माहिती मिळणार आहे. परंतु प्रत्यक्ष जे शिल्लक बेड आहेत, त्यावर वाढीव ताण असल्याचे दिसत आहे.
ठाणे : दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णांना आता रुग्णालयात बेड मिळणे मुश्किल झाले आहे. शहरातील विविध कोवीड रुग्णालयात केवळ ८ आयसीयुचे बेड शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने सुुर केलेल्या वेबसाईटवर दिसत आहे. तर नॉन आयसीयुचे १८४ बेड शिल्लक असल्याची माहिती दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात रुग्णालयांकडे विचारणा केली असता बेडच शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. तर साधे बेड देखील वेबसाईट शिल्लक असल्याचे दिसत असले तरी रुग्णाला अॅडमीट करतांना आधी तुमचा मेडीक्लेम आहे का? असा विचारले जात आहे. एखाद्याने मेडीक्लेम नाही, असे सांगितले तर बेड फुल्ल असल्याचे त्यांना सांगितले जात आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयाबरोबच खाजगी रुग्णालयांचाही ताण वाढतांना दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी रुग्ण वाढीचेही प्रमाण वाढतांना दिसत आहे. ठाण्यात आजच्या घडीला १७ कोवीड हॉस्पीटल आहेत. तर भार्इंदर पाडा येथे सोम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जात आहे. तर चार हॉटले एका शाळा आणि कौसा स्टेडीअममध्येही सोम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर यातील तीन हॉटेल फुल्ल झाले आहेत, तर एका हॉटेलमध्ये ५० बेड्स शिल्लक आहेत. तसेच कौसा स्टेडीअमध्ये १४४, हारोइझन स्कुलमध्ये ९१८ आणि भार्इंदरपाडा येथे ५ बेडस शिल्लक आहेत. परंतु ज्या रुग्णांची प्रकृती खालावत जात आहे, अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यासाठी आवश्यक असलेले आयसीयुचे मात्र ८ बेड शिल्लक आहेत. १७ रुग्णालये असतांनाही आता केवळ वेबसाईटवर ८ बेड आयसीयुचे शिल्लक असल्याचे दिसत आहे प्रत्यक्षात मात्र एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. तर नॉन आयसीयुचे १८४ बेड सध्याच्या घडीला शिल्लक असल्याचे वेबसाईटवर दाखविण्यात आले आहे. परंतु एखादा रुग्ण पॉझीटीव्ह आला तर त्याला प्रशासनाच्या अनेक साखळीतून पुढे जावे लागत आहे. संबधींत मेडीकल आॅफीसरशी बोला, त्यानंतर त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा अॅम्ब्युलेन्स आणि त्यानंतर हॉस्पीटल उपलब्ध करुन दिले जात आहे. परंतु याला देखील एक दिवसाचा कालावधी जात आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक देखील हैराण होत आहे. दुसरीकडे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून जर खाजगी रुग्णालयात बेडची व्यवस्था झालीच तर आधी तुमचा मेडीक्लेम आहे का? अशी थेट विचारणा केली जात आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून नाही असे उत्तर आले तर बेड शिल्लक नसल्याचे त्यांनी सांगितले जात आहे. परंतु मेडीक्लेम आहे, सांगितले तर तत्काळ बेड उपलब्ध करुन देण्याची हमी देखील दिली जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मेडीक्लेम नसेल त्या रुग्णांनी काय करायचे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
ठाणे महापालिकेने शहरात १०२४ बेडसचे कोवीड केअर सेंटर उभारले आहे. याठिकाणी सध्या २५ आयसीयु असून ते फुल्ल आहेत. तर इतर रुग्ण वेटींगवर असल्याचे सांगितले जात आहे. तर या ठिकाणी केवळ २०० चे मनुष्बळ असून रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या ही ७०० च्या आसपास आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळावर ताण पडत आहे. त्यातही महापालिकेच्या वेबसाईटवर या ठिकाणी ४९९ बेड्स शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यामध्ये ७६ बेड हे आयसीयुचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नॉन आयसीयुचे ४२३ बेडस शिल्लक असल्याचे दाखविले जात आहे. परंतु आयसीयूचा कारभार हातळण्यासाठी मनुष्यबळच नसल्याने नव्याने येणाऱ्या रुग्णांना वेटींगवर पाठविले जात आहे. तसेच शिल्लक असलेले ४२३ बेड देखील फुल्ल झाल्यास येथील अपुºया मनुष्यबळावर वाढीव ताण पडणार आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा भरतीची जाहीरात काढली आहे.