मुंबई पोलीस आयुक्तांनी केला विशेषाधिकाराचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे पाठोपाठ त्याचा साथीदार सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी यालाही सेवेतून बड़तर्फ करण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून ही कारवाई केली.
वाझेच्या अटकेनंतर काझी हा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होता. त्याची वेळोवेळी चौकशी करण्यात आली. स्फोटक प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे अखेर त्याला अटक करण्यात आली. काझी २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहे. त्याची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती.
पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाल्यानंतर काझीची गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सीआययू) नियुक्ती करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेने सीआययू पथकाचा प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हा वाझेसोबत काम करत होता. त्याचा जवळचा साथीदार म्हणून त्याला ओळखले जात हाेते.
सीआययूने केलेल्या अनेक महत्त्वाच्या कारवाईत ताे वाझेसोबत होता. वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यात काझी याची सशस्त्र पोलीस, नायगाव येथे उचलबांगडी करण्यात आली होती. काझीला अटक केल्यामुळे त्याला अटकेच्या दिवसापासून सेवेतून निलंबित करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी त्याची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली.
--------------------------