सिद्धार्थ पिठानी पाठोपाठ सुशांतच्या नोकरांंकडेही एनसीबीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:11+5:302021-06-01T04:06:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असताना, एनसीबी कारवाईमुळे हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असताना, एनसीबी कारवाईमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. यातील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याला हैदराबाद येथून अटक केली होती. त्यापाठोपाठ रविवारी सुशांतच्या घरी काम करणारे केशव आणि नीरज यांचीही कसून चौकशी सुरू केली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
सुशांतसिंहच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अमली पदार्थांसह ३५ जणांना आतापर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. यामध्ये सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि आता सिद्धार्थ पिठानी याच्या अटकेचा समावेश आहे. दरम्यान, रिया आणि शौविक दोघेही जामिनावर बाहेर आहेत.
दरम्यान, सिद्धार्थ पिठानी, केशव आणि नीरज हे तिघेही १४ जून २०२० रोजी सुशांतच्या घरी होते. त्याच दिवशी सुशांतचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर २८ मे रोज़ी सिद्धार्थला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. त्याला १ जूनपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे, तर केशव आणि नीरजही एनसीबीच्या रडारवर होते. यापूर्वी त्यांना एनसीबीने समन्स बजावले होते. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता, तसेच त्यांनी मोबाईल क्रमांकही बदलल्याचे समजते.
ऑगस्ट महिन्यात ते मुंबईत आले. मुंबईत एका अभिनेत्रीच्या घरी नोकरी करत होते. अखेर रविवारी दोघेही एनसीबी सामोर हजर झाले. त्यांच्याकडे रविवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू असल्यामुळे एनसीबीकडून या दोघांचा यात कसा सहभाग आहे? याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप् रकरणात त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
.......................................