वाहतूक पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर शहरातील बस संप तात्पुरता मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:18 AM2017-09-18T06:18:37+5:302017-09-18T06:18:39+5:30
वाहतूक पोलिसांनी शहर प्रवेशबंदीची कारवाई पुढील १० दिवस न करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. परिणामी शहरातील बस संप तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी शहर प्रवेशबंदीबाबत बसचालकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी चर्चेला बोलावले आहे. यामुळे चर्चेनंतर संपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई बसमालक संघटनेतर्फे देण्यात आली.
मुंबई : वाहतूक पोलिसांनी शहर प्रवेशबंदीची कारवाई पुढील १० दिवस न करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. परिणामी शहरातील बस संप तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी शहर प्रवेशबंदीबाबत बसचालकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी चर्चेला बोलावले आहे. यामुळे चर्चेनंतर संपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई बसमालक संघटनेतर्फे देण्यात आली.
पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर वाहतूक पोलिसांनी शहर प्रवेशबंदीनुसार खासगी बसवरील कारवाई त्वरित थांबवली. या धर्तीवर रविवारी संघटनेतर्फे सायन येथील नित्यानंद सभागृहात तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत संघटनेने तात्पुरता संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
वाहतूक विभागाचे सह आयुक्त यांच्याशी सोमवारी सायंकाळी पाच वाजता संघटनेचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. या चर्चेत बसचालकांवरील दिवसा असलेली ‘शहर प्रवेशबंदी’ हटवावी आणि ‘पार्किंगसाठी वाहतूक विभागाने परवडणाºया दरात जागा सुचवावी’ या मागण्या संघटनेतर्फे मांडण्यात येणार आहेत. याचबरोबर बसचालकांच्या समस्या आणि अडचणी चर्चेत मांडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
वाहतूक विभागाच्या शहर प्रवेशबंदीच्या पत्रकाला काही अधिकाºयांनी नापसंती दर्शवली होती. असे असतानाही शहर प्रवेशबंदीचे पत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार खासगी बससह स्कूल बस आणि कंपन्यांमधील बसवरदेखील कारवाई करण्यात आली. अखेर पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी करत १० दिवस कारवाई थांबवून संघटनेला चर्चेसाठी बोलावले.
>‘शहर प्रवेशबंदी’चा घटनाक्रम
१२ सप्टेंबर : वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अवजड वाहने आणि खासगी बसला ‘शहर प्रवेशबंदी’चे आदेश
१३ सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी अन्यथा कोर्टात जाणार - संघटनेचा पवित्रा
१४ सप्टेंबर : बसवर कारवाई, १९ व २० सप्टेंबर रोजी संघटनेची संपाची हाक
१५ सप्टेंबर : पोलीस आयुक्त व संघटना शिष्टमंडळाची बैठक, १० दिवस कारवाई न करण्याचे तोंडी आश्वासन
१६ सप्टेंबर : वाहतूक पोलिसांचे लेखी पत्रक जाहीर, सोमवारी चर्चेसाठी बोलावले