मुंबई – व्यायामशाळांमध्ये सर्रास प्रोटीन पावडर,स्टेरॉईड दिले जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेतल्यास आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असे डॉक्टर सांगतात. अन्न व औषध प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली असून लवकरच कारवाईस सुरुवात करण्यात येणार माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
व्यायामादरम्यान घेण्यात येणाऱ्या उत्तेजन औषधांच्या परिणामांमुळे मृत्यू ओढावत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देण्यात येणाऱ्या औषधांच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहर उपनगरातील अंधेरी, जुहू , विलेपार्ले, वांद्रे, गोरेगाव आणि मलाड मधील जिम मध्ये अवैध प्रोटीन पावडर तसेच स्टेरॉइड दिले जात असल्याचा आरोप ऑल फूड्स अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. या परिसरातील व्यायामशाळांमध्ये सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आहेत. त्यांना कमी वेळात अधिक शरीरयष्टी बनवायची असते, त्यासाठी त्यांना प्रशिक्षक प्रोटीन पावडर तसेच स्टेरॉइड देतात असेही पांडे यांनी सांगितले.
व्यायामशाळांमध्ये डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांची नेमणूक देखील नसते. अशा व्यायामशाळांमध्ये अवैधरित्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची विक्री होत असल्याची तक्रार पांडे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने लवकरच व्यायामशाळा व तेथील प्रशिक्षकांची चौकशी, तपासणी करण्यात येईल. यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी दिली आहे.
आरोग्यासाठी घातक
चांगल्या आरोग्यासाठी किंवा शरीर धष्टपुष्ट करण्यासाठी प्रोटीन पावडर खाण्याची क्रेझ वाढली आहे. नियमित व्यायामासह, फिटनेस प्रशिक्षक प्रोटीन पावडर किंवा प्रथिनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. कंपन्यांकडून बाजारात प्रोटीन पावडर विकणे साठी असतात, पण काहीवेळा ती आरोग्यासाठी तसेच लोकांच्या शरीरासाठी घातक ठरतात - डॉ. विकास बनसोडे