अन्न व औषध प्रशासन : ‘फूड सेफ्टी’मध्ये महाराष्ट्र अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:34 AM2019-06-14T02:34:53+5:302019-06-14T02:35:12+5:30
मुंबई : अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय)कडून ‘फूड सेफ्टी इंडेक्स’ नावाचा बहुमान यंदा महाराष्ट्र राज्यातील अन्न व औषध ...
मुंबई : अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय)कडून ‘फूड सेफ्टी इंडेक्स’ नावाचा बहुमान यंदा महाराष्ट्र राज्यातील अन्न व औषध प्रशासनाला मिळाला आहे. फूड सेफ्टी इंडेक्समध्ये ३० ते ३५ निकष असतात. या निकषांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. दिल्लीमध्ये नुकताच पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सोहळ्यामध्ये आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र)च्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या कामाप्रति प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांचीही उपस्थिती होती.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी यासंदर्भात सांगितले की, महाराष्ट्राने एफएसएसएआयच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड इत्यादी ठिकाणी स्वच्छतेची तपासणी केली. तसेच राज्यातील ३०० मंदिरे व गुरुद्वारांमध्ये महाप्रसादा (भोग)च्या अन्नाचा दर्जा सुधारणामध्ये महाप्रसाद कसा स्वच्छ आणि चांगला बनविता येईल, याचे मार्गदर्शन अन्न व औषध प्रशासनामार्फत केले. सेफ अॅण्ड न्युट्रीशियस फूड (एसएनएफ) अंतर्गत २०० ते २५० शाळांमध्ये हा उपक्रम एफडीए राबवित आहे. जेवण कसे करावे, हात कसे धुवावेत, कोणते अन्नपदार्थ खावेत? इत्यादीचे प्रशिक्षण एफडीएने शालेय विद्यार्थ्यांना दिले. याशिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाब्यामधील एक ते दीड लाख आणि स्ट्रीट फूड वेंडरमधील १७ हजार लोकांसाठी शिबिराचे आयोजन केले होते. या सर्व कामगिरीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.