मुंबई : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची एमटीपी किट ऑनलाइन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण ३४ ऑनलाइन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धेबाबत पडताळणी केली.
ॲमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची दोनवेळा ॲमेझॉनवर ऑर्डर स्वीकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स, पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय एमटीपी औषधाची ऑनलाइन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने ॲमेझॉन व संबंधित वितरक यांना नोटीस बजावली असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.
दुसऱ्या प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदविली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोनवेळा औषधांची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचेदेखील संकेतस्थळावरून एसएमएसद्वारे कळविण्यात आले. गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार देणे, हेदेखील कायद्याचे उल्लंघन असल्याने फ्लिपकार्ट या संस्थेस नोटीस बजाविण्यात आली आहे.
नुकतेच पुणे येथे ॲमेझॉन या संकेतस्थळावरून एमटीपीची विक्री पुण्यातील औषधविक्रेत्यास केल्याने या औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करत यामध्ये सहभागी असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुद्ध पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.