Join us

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ होणार स्वस्त; GST १८ हून ५ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:05 PM

जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के होणार!

संजय घावरेमुंबई : भारतात मल्टिप्लेक्स सिनेमागृहे सुरू झाल्यापासूनच इथल्या सिनेमांच्या तिकीट दरांपेक्षा खाद्यपदार्थांचे दर अवास्तव असल्याची ओरड नेहमीच असते. वेळोवेळी याबाबत आंदोलनेही करण्यात आली. त्याचा फारसा परिणाम झाला नाही, पण आता मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांवरील जीएसटी कमी होणार असल्याने, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे पाहत खाण्याचा आनंद लुटणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ खरेदी करणे परवडत नसल्याने, बरेच सर्वसामान्य प्रेक्षक उपाशीपोटी सिनेमा पाहतात. पण लवकरच ही परिस्थिती काही अंशी बदलणार आहे. जीएसटी कौन्सिलने सर्वसामान्य सिनेप्रेमींना दिलासा देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिनेमागृहात खाद्यपदार्थांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. या निर्णयामुळे आता पाण्याची बाटली, पॉपकॉर्न, समोसे, बर्गर, पनीर टिक्का सँडविच, फ्रेंच फ्राइज आदी सर्वच महागड्या खाद्यपदार्थांसाठी प्रेक्षकांना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आपोआपच मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहताना चटपटीत खाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. याचा परिणाम मल्टिप्लेक्सच्या एकूण व्यवसायावर होणार असून, प्रेक्षकांचा मल्टिप्लेक्सकडे ओढा वाढणार असल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खाद्यपदार्थ आणि शीतपेये विक्री हे सिनेमा प्रदर्शन उद्योगासाठी कमाईचे महत्त्वाचे स्रोत आहेत. विशेषत: यातून मल्टिप्लेक्सला ३५ टक्के कमाई होते. नवीन जीएसटी दर कधीपासून लागू होतील, हे स्पष्ट झालेले नाही.

सिनेमागृहांमध्ये विक्री होणारे खाद्यपदार्थ व पेये रेस्टॉरंट सर्व्हिसच्या व्याख्येत समाविष्ट होतील आणि जीएसटी दर ५ टक्के लागू होईल. जीएसटी परिषदेने जारी केलेल्या या निर्णयाचे संपूर्ण सिनेमा उद्योग स्वागत करतो. हा निर्णय देशभरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांसाठी फायदेशीर असून, यामुळे कोरोना महामारीनंतर थिएटर व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यास मदत होईल.- नितीन सूद, (सीएफओ, पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड)

मात्र, एक अट आहे...मल्टिप्लेक्समध्ये कमी दरात खाद्यपदार्थ खाण्यासाठी एक अट आहे. ३ टक्के जीएसटी दर फक्त स्वतंत्रपणे खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यावरच लागू होतील. सिनेमाच्या तिकिटासोबत एकत्रित खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास सिनेमाच्या तिकिटांसाठी लागू असलेला १८ टक्के जीएसटी खाद्यपदार्थांनाही लागू होईल. याचा परिणाम ऑनलाइन बुकिंग करताना खाद्यपदार्थ आणि तिकीट एकत्रितपणे खरेदीवर होणार आहे. 

टॅग्स :मुंबई