Food: खव्याचे पदार्थ खात असाल तर हे वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:09 PM2023-09-11T13:09:41+5:302023-09-11T13:09:59+5:30
Food: पुढील तीन महिने महाराष्ट्रात सणासुदींचे दिवस असतील. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तोंड गोड करण्याकरिता घरी तयार केलेल्या किंवा रेडिमेड मिठाईचा वापर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
- महेश झगडे
(माजी प्रधान सचिव, अन्न व औषध प्रशासन विभाग)
पुढील तीन महिने महाराष्ट्रात सणासुदींचे दिवस असतील. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तोंड गोड करण्याकरिता घरी तयार केलेल्या किंवा रेडिमेड मिठाईचा वापर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या तीन महिन्यांत देशात मिठाईच्या वापराचा उच्चांक असतो. मिठाईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची बाजारपेठ देशभर आहे. साखर, तुपासोबत खवा किंवा मावा अत्यंत महत्त्वाचा.
दूध आटवून खवा करण्याची प्रक्रिया देशभर सुरू होते. दुधाची निर्मिती बाराही महिने सर्वसाधारणपणे समप्रमाणात होते. पण सणासुदीच्या या तीन महिन्यांत खव्याच्या मागणीमध्ये प्रचंड तत्कालिक वाढ होते, त्या तुलनेत दुधाची निर्मिती वाढत नाही.
मागणी आणि पुरवठा यामध्ये होणाऱ्या या प्रचंड तफावतीचा गैरफायदा घेत खव्यामध्ये इतर पदार्थ मिसळून त्याची विक्री करून भरमसाठ नफा कमविणारे ‘उद्योगी’ देशभर पसरले असून, ते ग्राहकांच्या जीवाशी भयंकर खेळ खेळतात.
खवा तयार झाल्यानंतर त्याची वाहतूक निर्जंतुक व वातानुकूलित परिस्थितीत झाली नाही तर त्याचे आरोग्यावर भयंकर दुष्परिणाम संभवतात. ग्राहकांना आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावेत म्हणून २०११ पासून देशात अन्नसुरक्षा व मानके नावाचा अत्यंत प्रभावी कायदा लागू झाला आहे. त्यामध्ये गायींच्या गोठ्यांपासून ग्राहकापर्यंत दुधाची वाटचाल आणि दुधाचा खव्यामध्ये परिवर्तन होण्याची प्रक्रिया असते. त्या सर्वांची गुणवत्ता राखण्यासाठी कायद्यात तरतुदी असून, त्यांचे पालन करण्यासाठी तालुका पातळीपासून देशपातळीपर्यंत यंत्रणा आहे.
भेसळयुक्त किंवा आरोग्यास घातक खव्याचा त्रास ग्राहकांना झाल्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई होण्याऐवजी ग्राहकांपर्यंत असा भेसळयुक्त खवा पोहचू नये म्हणून कायदा आहे. तरी दरवर्षी भेसळयुक्त खवा सणासुदीच्या काळात पकडला गेल्याच्या बातम्या येत राहतात, पण भेसळयुक्त खवा पकडला जात नाही. तो ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांचा जीव धोक्यात घातला जातो, हेही तितकेच सत्य. भेसळयुक्त किंवा दर्जाहीन खवा विकला जाऊ नये याची संपूर्ण जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे, पण हे प्रशासन विकलांग झाल्यामुळे भेसळयुक्त खवा बाजारात येणारच नाही याची खात्री देता येत नाही. यासाठी ग्राहकांनीच जागरूक व्हावे लागेल.
शासनाने खव्याची गुणवत्ता ठरवली असून त्यामध्ये कमीत कमी ५५ टक्के घनपदार्थ, ३० टक्के दुधापासून निर्मित असलेले सिग्न स्थिग्धांश आणि तो भेसळमुक्त असला पाहिजे. नियमातील गुणवत्तेप्रमाणे खवा नसेल तर खव्याचे निर्माते आणि विक्रेते यांना शिक्षा किंवा दंड होऊ शकतो.
हे लक्षात ठेवा
सणासुदीच्या महिन्यामध्ये वाढीव पुरवठा करता होणे शक्य व्हावे म्हणून चार-पाच महिने अगोदरच खवा तयार करून तो शीतगृहामध्ये ठेवण्याचीही प्रथा आहे.
साठवलेल्या खव्याचे तापमान योग्य प्रमाणात राखले गेले नाही व त्यामध्ये घातकी बॅक्टेरिया, बुरशी इत्यादीची वाढ होऊन तो खाण्यालायक राहत नाही.
शीतगृहामध्ये साठवणुकीचा खर्च वाचावा म्हणून खव्यामध्ये फॉरमॅलिन हे अत्यंत घातक रसायन मिसळले जाते. असा खवा बाकी बाबतीत गुणवत्तापूर्ण असला तरी आरोग्यासाठी हानिकारक असतो.
ज्या दुधापासून खवा तयार केला जातो ते दूधच मूलतः नैसर्गिक ऐवजी कृत्रिमरीत्या तयार केलेले रासायनिक दूध असेल तर तो आणखी एक आरोग्यासाठी घातक प्रकार.
युरिया आणि अन्य वर्ज्य रसायने वापरून कृत्रिम दूध तयार करून विकणारे गुन्हेगारी तत्त्व देशात सर्वदूर पसरले आहे. अशा दुधापासून तयार होणार खवा मुळातच भेसळयुक्त ठरतो.
अशी ओळखा खव्यामधील भेसळ
एक कपभर उकळत्या पाण्यात एक चमचा खवा मिसळावा, त्यामध्ये ३-४ थेंब आयोडीनचे सोडावेत. जर मिश्रण निळे झाले तर समजावे की खव्यामध्ये गहू, तांदूळ किंवा अन्य पीठ, बटाटा, रताळी इत्यादींची भेसळ केलेली आहे.
खव्याची हातावर गोळी करण्याचा प्रयत्न करताना तो दाणेदार असल्याचे भासले नाही आणि हात तेलकट झाला नाही तर त्यामध्ये भेसळ आहे, असे समजावे.
काचेच्या ग्लासात खव्याचा नमुना घेऊन त्यात सल्फ्युरिक ॲसिड सोडावे. मिश्रणाचा रंग जांभळा झाला तर त्यात फॉरमॅलिन आहे असे समजावे. (सल्फ्युरिक ॲसिड वापरताना काळजी घ्यावी)