जेवण बाहेरचे, पण ताटे घासण्याचे काम BMC कँटीन कर्मचाऱ्यांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:05 PM2023-07-17T12:05:14+5:302023-07-17T12:05:54+5:30

महापालिकेच्या मुख्यालयातील प्रकार

Food is outside, but the work of washing the plates is in the hands of the canteen staff | जेवण बाहेरचे, पण ताटे घासण्याचे काम BMC कँटीन कर्मचाऱ्यांच्या हाती

जेवण बाहेरचे, पण ताटे घासण्याचे काम BMC कँटीन कर्मचाऱ्यांच्या हाती

googlenewsNext

रतींद्र नाईक

मुंबई : संपूर्ण मुंबईचा प्रशासकीय कारभार हाकला जाणाऱ्या  महापालिकेच्या मुख्यालयात समारंभ, पार्ट्या केल्या जातात, तेव्हा त्यावेळी खाण्यासाठी बाहेरच्या केटर्सकडून खाद्यपदार्थ, जेवण मागविण्यात येते. परंतु, त्यावर ताव मारल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणारी महापालिकेच्याच कँटीनची ताटे-भांडी घासण्याचे काम मात्र या कँटीनच्या कर्मचाऱ्यांच्या हाती देऊन माथी मारले जात असल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेचे मुख्यालय ही हेरिटेज इमारत आहे. तेथूनच संपूर्ण मुंबईचा डोलारा सांभाळला जातो. आयुक्तांसह विविध प्रशासकीय विभागांच्या प्रमुखांचीही कार्यालये आहेत. या पालिका मुख्यालयात कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी कँटीनची देखील सोय आहे. पण, पालिकेच्या मुख्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वाढदिवस असो किंवा एखादा सण, समारंभ यानिमित्त बाहेरचे चवदार जेवण आपल्या सहकाऱ्यांना घालायचे ही प्रथाच गेल्या काही वर्षांत पडली आहे. इतकेच नव्हे तर पालिकेत विविध देशांचे प्रतिनिधी  अथवा राज्यातले अधिकारी अभ्यास दौऱ्यावर अथवा पाहुणे म्हणून येतात. त्यांचा पाहुणचार करण्यासाठी व त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी अनेकदा दुसऱ्या केटरर्सकडून जेवण मागवले जाते. या जेवणासाठी भांडी मात्र अनेकदा पालिका मुख्यालयातील कँटीनमधील वापरली जातात इतकेच नव्हे तर पोटभर जेवल्यानंतर विविध विभागांत ही भांडी ‘बेवारस’ होऊन पडलेली राहतात. मात्र, ही अशी ही भांडी नाईलाजाने पालिका कँटीनमधील कर्मचाऱ्यांना घासावी लागतात. कामात आणखी अतिरिक्त काम वाढत असल्याने कँटीनमधील या कर्मचाऱ्यांकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात येते.

अतिरिक्त पैसे द्या
मुंबई महापालिकेचे कँटीन श्री सिद्धिविनायक केटरर्समार्फत चालवले जात असून कूक, वेटर व इतर कर्मचारी धरून २२ लोक येथे काम करतात. पालिका मुख्यालयातील कँटीनमध्ये दररोज ५०० ते ७०० ताट जेवण विकले जाते. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या या जेवणासह बाहेरून ऑर्डर केलेल्या जेवणाची भांडी घासावी लागत असल्याने त्याचा त्रास कामगारांना होतो. त्यामुळे या कामाचे अतिरिक्त पैसे द्यावेत अथवा सबसिडी द्यावी, अशी मागणी पालिका कँटीनचे कर्मचारी करत आहेत.

 

Web Title: Food is outside, but the work of washing the plates is in the hands of the canteen staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.