मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ आता ५० रुपयांत मिळणार, चालकांचे राज ठाकरेंना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:26 AM2018-07-08T06:26:13+5:302018-07-08T06:26:30+5:30
मल्टिप्लेक्समधील महागड्या दरांचा विषय न्यायालयात असतानाच त्यांच्या चालकांनी चहा, कॉफी, वडा, समोसा, पॉपकॉर्न, पाण्याची बाटली यांचे दर ५० रुपये करण्याचे आश्वासन शनिवारी दिले. येत्या दोन-तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा त्यांना मनसेने पुन्हा दिला.
मुंबई - मल्टिप्लेक्समधील महागड्या दरांचा विषय न्यायालयात असतानाच त्यांच्या चालकांनी चहा, कॉफी, वडा, समोसा, पॉपकॉर्न, पाण्याची बाटली यांचे दर ५० रुपये करण्याचे आश्वासन शनिवारी दिले. येत्या दोन-तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा त्यांना मनसेने पुन्हा दिला.
मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दरावरून मनसेने आंदोलन सुरू केल्याने त्यांच्या चालकांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यात किमती कमी करण्याचा निर्णय झाला. या विषयावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर पुण्यात मनसेने एका मल्टिप्लेक्समध्ये तोडफोड केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तिला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्यकारी अध्यक्षा शालिनी ठाकरे, पुण्यात आंदोलन करणारे किशोर शिंदे हेही उपस्थित होते.
राज यांचे आक्षेप
1थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या वडा, समोसा, पॉपकॉर्न, चहा, कॉफी, पाण्याची बाटली यांचे दर माफक असावेत. बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावे, याला मनसेचा आक्षेप नसेल.
2थिएटरमधील कर्मचारी प्रेक्षकांशी उर्मटपणे वागल्यास कारवाई व्हावी. प्रेक्षकांनी विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारू नये.
3लहान मुले, मधुमेही, हृदयविकाराच्या रुग्णांना घरचे किंवा आवश्यक ते अन्न नेण्यास मुभा असावी.
...हे मल्टिप्लेक्सना मान्य
1 पाण्याची बाटली, चहा, कॉफी, पॉपकॉर्न, समोसा, बटाटावडा यांचे दर ५० रुपयांदरम्यान आकारणार.
2प्रेक्षकांच्या कोणत्याही तक्रारींबाबत कोणाशी संपर्क साधावा, याचा तपशील थिएटरच्या स्क्रीनवर दाखवणार.
3लहान मुले, मधुमेही आणि हृदयविकाराच्या रुग्णांना त्यांच्यासाठी आवश्यक अन्नपदार्थ थिएटरमध्ये आणण्यास कोणतीही आडकाठी केली जाणार नाही.