पालिकेच्या बी विभागातील १० अधिकाऱ्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:33 AM2019-02-01T05:33:12+5:302019-02-01T05:34:30+5:30
जे.जे.त उपचार सुरू; कँटिनमधील पदार्थ खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली
मुंबई : मुंबई महापालिकेच्या बी विभागातील कर्मचाºयांना गुरुवारी सकाळी खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. नागपाडा येथील बाबुला टँक परिसरात असणाºया महापालिकेच्या कार्यालयातील कँटिनमधील पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळाने १० अधिकारी-कर्मचाºयांची प्रकृती बिघडली. या १० जणांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
कार्यालयाच्या कँटिनमध्ये बनविलेले पदार्थ खाऊन कर्मचाºयांना विषबाधा झाली असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाºयांना उलट्या, जुलाब, चेहरा लाल पडणे, चक्कर येणे आणि डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना जवळच्या साबुसिद्दिकी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एकूण १० जणांना विषबाधा झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातून मिळाली आहे. यामध्ये ६ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. तर प्रतीक्षा मोहिते यांचा रक्तदाब कमी झाल्याचे सांगण्यात आले.
याविषयी जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले की, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या १० कर्मचारी व अधिकाºयांना जे.जे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतरदेखील त्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता आहे. सध्या रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णांची नावे व वय
निशांत सूर्यवंशी (२७), कृष्णकांत धनावडे (४९), चंद्रकांत पाटील (२१), तनय जोशी (५६), चंद्रकांत जांभोळी (४०), तृप्ती शिर्के (३५), प्रतीक्षा मोहिते (२१), सविता पंडित (३५), सुषमा लोखंडे (४७)
इडली-डोसा की उसळपाव?
कँटिनमधील इडली, डोसा खाल्ल्याने बाधा झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तर, जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून कँटिनमधील उसळपाव खाल्ल्याने त्रास झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नेमक्या कोणत्या पदार्थातून ही बाधा झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर कँटिन बंद, एफडीएकडे नमुने तपासणीसाठी
कार्यालयातील कँटिन खूप वर्षांपासून सुरू होते, मात्र गुरुवारी घडलेल्या घटनेनंतर ते त्वरित बंद करण्यात आले आहे. अन्न व पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते एफडीएकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालात दोष आढळल्यास कँटिनवर कारवाई करण्यात येईल.
- विवेक राही, साहाय्यक आयुक्त, बी वॉर्ड