चारकोप मध्ये लस्सीमधून विषबाधा, जवळपास बारा कामगारांची प्रकृती बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 12:50 PM2018-04-08T12:50:45+5:302018-04-08T12:50:45+5:30
चारकोपमध्ये लस्सी प्यायल्यानंतर बारा कामगारांची प्रकृती बिघडली आहे. हा प्रकार शनिवारी संध्याकाळी घडला असुन चारकोप पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई - चारकोपमध्ये लस्सी प्यायल्यानंतर बारा कामगारांची प्रकृती बिघडली आहे. हा प्रकार शनिवारी संध्याकाळी घडला असुन चारकोप पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.
चारकोपच्या हिंदुस्थान नाक्याजवळ एक बक्कल कंपनी आहे. उकाड्याने हैराण झालेक्या या कामगारांनी काही पैसे जमा करत जवळच्या दुकानातून लस्सी मागवली. ती प्यायल्या नंतर अचानक दोघांची तब्बेत बिघडली. त्याला उलट्या होऊ लागल्याने इतरांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करविले. डॉक्तरने त्याला तपासत अन्य कामगारांना देखील रुग्णालयात ऍडमीट करुन घेतले. 'माझी पत्नी महादेवी सुनगार (३८) हिला देखील लस्सी प्यायल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने तिला आम्ही ऍडमिट करविले. वीस वीस रुपये जमा करून त्यांनी लस्सी मागवली होती, ज्यानंतर तिची प्रकृती बिघडली', अशी माहिती महादेवी यांचे पती हनुमंता यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. या सर्वांना चारकोपच्या शिवम आणि अथर्व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या लस्सीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.