लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेस म्हणजे सर्व काही चकचकीत. सर्वोत्तम. साहजिकच जेवणाचाही दर्जा उत्कृष्ट असणे ही रास्त अपेक्षा. मात्र, प्रत्यक्षात या चकाचक गाडीतील जेवणाच्या दर्जाबद्दल प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
निदान साईनगर शिर्डी ते सीएसएमटी या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तरी प्रवाशांना तसा अनुभव आला. या गाडीतील एका प्रवाशाच्या वाट्याला आला शिळा नाचणीचा लाडू. त्यावर प्रवाशांना दर्जेदार जेवण देण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना पहाटे उठून सर्व तयारी करावी लागते. मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी तीन ते चार तास लागतात. घडली असेल चुकून एखादी घटना... ही रेल्वेची प्रतिक्रिया!
शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला शिळे नाचणीचे लाडू दिले तसेच त्याचा बॉक्सही फाटलेला होता. त्यामुळे प्रवाशाने ट्वीट करून संताप व्यक्त केला. प्रवासी संदीप त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात की, शिर्डीवरून मुंबईला येण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला. या प्रवासात आयआरसीटीसीकडून जेवण देण्यात येते. गोड पदार्थांमध्ये नाचणीचा लाडू देण्यात आला होता. या लाडूचा बॉक्स फाटलेला होता तसेच त्यामध्ये लाडू शिळा होता. हा प्रकार संतापजनक आहे. दरम्यान, आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता प्रवाशांसाठी जेवण तयार करायला ३ ते ४ तास लागतात. मोठ्या प्रमाणात जेवण तयार केले जाते. चुकून एखादी घटना घडली असेल. या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर आहोत.