फिल्मसिटीमधील कॅटरर्सना एफडीएकडून अन्नसुरक्षेचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:58 AM2020-01-07T00:58:43+5:302020-01-07T00:58:52+5:30
अन्न व औषध प्रशासन, ईट राइट इंडिया आणि एफएसएसएआयतर्फे फिल्मसिटीमधील कॅटरर्सवाल्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : अन्न व औषध प्रशासन, ईट राइट इंडिया आणि एफएसएसएआयतर्फे फिल्मसिटीमधील कॅटरर्सवाल्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील विसलिंग वुड इन्स्टिट्यूटमधील कर्मा फाउंडेशन हॉलमध्ये सोमवारी कार्यशाळा संपन्न झाली.
‘द वर्कशॉप आॅन हायजेनिक, सेफ अॅण्ड व्होलसम फूड टू द फिल्म फ्रटरनिटी’ या विषयावर सहायक आयुक्त (अन्न) पी. बी. उमराणी यांनी सादरीकरणातून कॅटरर्सवाल्यांना मार्गदर्शन दिले. प्रशासनाच्या वतीने फिल्मसिटीमध्ये कॅटरर्सच्या तपासण्या केल्या असता सदर ठिकाणी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे फिल्मसिटीमध्ये कार्यरत असलेला प्रत्येक कर्मचारी फिल्म शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याचे आरोग्य व खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते.
या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ताजे व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावे, म्हणून अन्न व औषध प्रशासनाने फिल्मसिटीमधील कॅटरर्सना एका छताखाली बोलावून कार्यशाळेचे आयोजन केले होते.
>फिल्मसिटीमधील कॅटरर्सवाल्यांना स्वच्छतेबाबत अधिक माहिती दिली गेली आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षेबाबत घ्यायच्या दक्षतेबाबत सादरीकरण दाखविण्यात आले. याशिवाय अन्नाचा परवाना घेणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कॅटरर्सवाल्यांना काही दिवसांचा कालावधी देऊन संबंधित लोक अन्नाबाबतचे सर्व नियम व अटी पाळत आहेत का? हे अन्न व औषध प्रशासनाकडून तपासले जाईल. कोणी नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
- डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन