Join us

आरे केंद्रांवर खाद्यपदार्थ विक्रीला मिळणार परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दूधविक्रीतून मिळणाऱ्या अत्यल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर आरे दूध वितरण केंद्रधारकांना दुधासोबतच अन्य खाद्यपदार्थ विक्रीची मुभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दूधविक्रीतून मिळणाऱ्या अत्यल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर आरे दूध वितरण केंद्रधारकांना दुधासोबतच अन्य खाद्यपदार्थ विक्रीची मुभा मिळणार आहे. राॅयल्टी तत्त्वावर खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी विभागाला दिले, तसेच शासकीय दुधाच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी वितरण केंद्राना भेट देऊन तपासणीची कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

वरळी आणि आरे डेअरी येथील दूधवितरकांच्या विविध मागण्यांसंदर्भात भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी दुग्धव्यवसाय विकास विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, उपायुक्त श्रीकांत शिरपूरकर, दुग्धविकास अवर सचिव राजेश गोविल, दुग्ध महाव्यवस्थापक डी.डी. कुलकर्णी, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, तसेच दूधवितरक केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. खाद्यपदार्थ विक्रीला मान्यता द्यावी व वितरकांनी या बदल्यात शासनाला रॉयल्टी द्यावी. केंद्र चालकांच्या करारामध्ये वेळोवेळी सुधारणा करून त्यांना दूधविक्रीचा लाभ द्यावा. दूध वाहतुकीकरिता वितरणासाठी खुली निविदा काढावी. मयत दूध वितरण केंद्रधारकांच्या रक्ताच्या नात्यातील वारसांना केंद्र हस्तांतरित करावी, अशा मागण्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही भरणे यांनी दिली.

कामगार वसाहतीमधील दूध वितरक कर्मचाऱ्यांच्या वसाहती दुरुस्त करण्याबाबतचा प्रस्ताव सेवानिवृत्त कामगारांची प्रलंबित देणी, निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी, तसेच अन्य सेवानिवृत्ती लाभाची रक्कम याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त भांगे यांनी सांगितले.