भिकाऱ्यांचा उपद्रव

By admin | Published: June 2, 2016 01:43 AM2016-06-02T01:43:47+5:302016-06-02T01:43:47+5:30

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. पादचारी तसेच खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या भिकाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Foolish foe | भिकाऱ्यांचा उपद्रव

भिकाऱ्यांचा उपद्रव

Next

प्राची सोनवणे,  नवी मुंबई
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. पादचारी तसेच खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या भिकाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रमुख सिग्नल, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, बसथांबे, स्कायवॉक आदी परिसराला भिकाऱ्यांनी विळखा घातला आहे.
एकीकडे प्रशासनाच्या वतीने शहराच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जात आहे तर दुसरीकडे याच सौंदर्याला बाधा आणणाऱ्या भिकाऱ्यांवर मात्र ठोस कारवाई केली जात नाही. उदरनिर्वाहाचा सर्वात सोपा मार्ग असलेल्या या भीक मागण्याच्याही टोळ्या चालविल्या जातात. अरेरावी करून नागरिकांकडून बळजबरीने पैसे मागितले जातात. पैसे न दिल्यास शिवीगाळ करणे, पाठलाग करणे, पाय धरणे असे प्रकार रस्त्यात पहायला मिळतात.
वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, सानपाडा, तुर्भे, खारघर, कळंबोली, पनवेल परिसरातील सिग्नलवर मोठ्या संख्येने भिकारी पहायला मिळतात. रेल्वे स्थानक परिसरातही या भिकाऱ्यांचा उपद्रव वाढत असून लोकल डब्यामध्येही या भिकाऱ्यांनी शिरकाव केला आहे. भीक मागणाऱ्या टोळीत तान्ह्या मुलांना घेऊन फिरणाऱ्या महिलादेखील मोठ्या प्रमाणात पहायला मिळत असून, अनेकदा ही तान्ही मुले अशी रस्त्यावर टाकून या महिला भीक मागताना पहायला मिळतात. सकाळी वेगळे तर संध्याकाळी वेगळे असे नवनवीन चेहरे सिग्नलवर पहायला मिळतात. बेगर्स अ‍ॅक्टखाली कारवाई करून यावर निर्बंध घालता येऊ शकतो, मात्र शासकीय व्यवस्था याबाबतीत कसल्याही ठोस उपाययोजना राबवित नाही. 1प्रशासन, सिडको, नवी मुंबई पोलीस तसेच वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने या भिकाऱ्यांची मनमानी वाढत चालली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने या भिकाऱ्यांकरिता विशेष मोहीमदेखील राबविण्यात आली होती तरीदेखील परिस्थिती जैसे थे आहे. अनेकदा कारवाईदरम्यान हे भिकारी किळसवाणे हावभाव करतात. 2अनेक ठिकाणी भिकाऱ्यांनी संसार मांडला असून त्याच ठिकाणी चुली पेटवल्या जातात. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही भिकाऱ्यांच्या लहान मुलांकडून नागरिकांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावण्याचे प्रकार घडतात.टोळी चालविणाऱ्या मुख्य व्यक्तींकडून या मुलांना खेळणी व इतर साहित्य विक्रीसाठी दिले जाते. साहित्य संपल्यावर पुन्हा भीक मागण्यासाठी हीच मुले विविध परिसरात पहायला मिळतात. लहान मुलांबरोबरच वयोवृध्द, अपंगांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे पहायला मिळते. प्रत्येक सिग्नलवर साधारणत: विविध वयोगटातील १५ ते २० भिकाऱ्यांचा वावर असतो. यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडून गाड्यांचा काचा पुसणे, गजरे विकणे, खेळणी विकणे अशा प्रकारची कामे करवून घेतली जातात.
टोळ्यांमार्फत होतेय भिकाऱ्यांचे आॅपरेटिंग
भीक मागणाऱ्या टोळ््या शहरात ठिकठिकाणी पसरल्या असून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने भिकारी आणि भीक मागायला लावणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा तेजीत सुरू आहे. यामध्ये तान्हा मुलांपासून ते वयोवृध्द व्यक्तींचा समावेश या भिकाऱ्यांच्या टोळीत पहायला मिळतो. या भिकाऱ्यांनी आपआपल्या जागा ठरवून घेतल्या असून,त्यानुसार त्यांचा रोजचा धंदा सुरु असतो. महत्त्वाच्या, वर्दळीच्या ठिकाणी १५हून अधिक भिकारी पहायला मिळतात तर कमी वर्दळ असलेल्या परिसरात १० पेक्षा कमी भिकारी दिसून येतात.

Web Title: Foolish foe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.