आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी फूट मसाज, पेट आणि आर्ट थेरपी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 08:48 AM2023-12-04T08:48:30+5:302023-12-04T08:48:43+5:30
मुलाखतींना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांमधील ताणतणाव दूर करण्यासाठी प्रशासनाकडून ‘रिचार्ज झोन’ची उभारणी
मुंबई : नोकरीसाठीची मुलाखत म्हटले की चिंता, धाकधूक ही आलीच. त्यात प्रश्न परदेशातील नोकरीचा, लाखो-करोडोंच्या पॅकेजचा असतो तेव्हा, ही धाकधूक अधिकच वाढते. विद्यार्थ्यांमधली ही अस्वस्थता ओळखून यंदा पवईच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने (आयआयटी) समुपदेशनासह विद्यार्थ्यांकरिता आगळेवेगळे ‘रिचार्ज झोन’ कार्यरत केले आहेत.
मुलाखतींना सामोरे जाताना येणारा ताणतणाव दूर करण्यासाठी आयआयटीने तयार केलेल्या या केंद्रात फूट मसाज, पेट थेरपी, आर्ट थेरपीसारख्या आनंददायी, कृतीशील उपचारपद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. ‘आयआयटी’चे अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत असून आपल्या अस्वस्थतेला मोकळी वाट करून देत आहेत. डिसेंबरमधील ‘प्लेसमेंट सीझन’ जसजसा जवळ येतो तसतसा ‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांचा एक गट तणावाखाली दिसू लागतो. ही अस्वस्थता पुढील महिनाभर असते. या विद्यार्थ्यांना गरज भासल्यास समुपदेशनाची सुविधा ‘आयआयटी’च्या ‘विद्यार्थी कल्याण केंद्रा’तर्फे (स्टुडंट्स वेलनेस सेंटर) गेली अनेक वर्षे दिली जात आहे.
या संस्थेचे सात-आठ प्रशिक्षक फूट मसाज करण्यासाठी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायची आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी रंग, ब्रश, कॅनव्हास यांची सोय करण्यात आली आहे. या शिवाय ताणतणाव दूर करण्यासाठी वापरल्या जाणारी डॉग थेरपी उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रात दोन श्वान असून विद्यार्थी त्यांच्याशी येऊन कितीही वेळ खेळू शकतात, अशी माहिती केंद्राचे हंगामी प्रमुख आणि समुपदेशक शौकत अली यांनी दिली. विद्यार्थ्यांचा याला इतका प्रतिसाद आहे, की अनेकदा केंद्राबाहेर रांग लागलेली असते.
आयआयटी प्लेसमेंट सीझनच्या विद्यार्थी अनेकदा गोंधळलेले असतात. अनेकांमध्ये पराकोटीची अस्वस्थता असते. या काळात एक समावेशक दृष्टिकोन बाळगून केवळ त्यांचे समुपदेशनच नव्हे तर माईंडफुलनेस कृतीतून त्यांच्या ताणतणावांना मोकळी वाट करून देण्याचा हा प्रयत्न आहे. - शौकत अली, समुपदेशक