धोकादायक विलेपार्ले पादचारी पुलावर अंधेरी पूल दुर्घटनेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 10:18 AM2018-07-18T10:18:21+5:302018-07-18T11:13:03+5:30
शिवसेनेने केली रेल्वे प्रशासनाकडे तक्रार
मनोहर कुंभेजकर
मुंबई - 3 जुलै रोजी अंधेरी गोखले पादचारी पुलाचा भाग कोसळून पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे 12 ते 15 तास पूर्णपणे ठप्प झाली होती. या दुर्घटनेत अस्मिता काटकर या महिलेचा दुर्दवी मृत्यू झाला होता. अंधेरी पुलाच्या जवळ असलेल्या रेल्वेच्या अख्यारित असलेल्या विलेपार्ले पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच येथील संरक्षक जाळ्या देखील गंजलेल्या व तुटलेल्या असून येथे विजेचा जोडण्यादेखील उघड्या आहेत. त्यामुळे या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं समोर आलं आहे.
अंधेरी पुलासारखी दुर्घटना विलेपार्ले पादचारी पुलावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेने या पुलाच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला असून याबाबत रितसर तक्रार रेल्वे प्रशासनाकडे केली असल्याची माहिती शाखा क्रमांक 84 चे शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
विलेपार्ले पूर्व व पश्चिमेकडे पार्लेकरांना जाण्यासाठी तसेच येण्यासाठी पूर्वी आझाद रोडवर रेल्वे फाटक होते. पार्लेकर पूर्वी फाटक बंद असताना ते ओलांडून पूर्व पश्चिम ये-जा करत होते. फाटकामुळे पश्चिम रेल्वेच्या वेगाला ब्रेक लागत होता. त्यामुळे 7 वर्षापूर्वी पार्लेकरांच्या सोयीसाठी येथे रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधला होता. या पुलाचा उपयोग विशेष करून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक जास्त करतात. अंधेरी पुलासारखी दुर्घटना येथे घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडे या पूल तातडीने बंद करून या पूलाची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेने पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केल्याची माहिती डिचोलकर यांनी दिली.