मुंबई : भारत यावर्षी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असून ही स्पर्धा भारतीय क्रीडा क्षेत्रात टर्निंग पॉइंट ठरेल, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर मंगळवारी राव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील ‘उर्जा कप’ १९ वर्षांखालील फुटबॉल टॅलेंट हंट मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी, ते बोलत होते. त्याचबरोबर यावेळी ओलिम्पियन नेमबाज अंजली भागवत, अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान राव म्हणाले की, ‘१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भारतीय क्रीडा इतिहासात निर्णायक ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात क्रीडा संस्कृतीचा प्रसार करण्याबाबत गांभिर्याने प्रयत्न करत आहेत.’ त्याचप्रमाणे, ‘प्रत्येक खेळामध्ये सहभागी खेळाडू हा विजेता असतो. येथे कोणीही पराभूत नसतो. खेळांमुळे प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. तसेच खेळातून निर्माण होणारी खिलाडूवृत्ती आपल्या आयुष्यात कायम राहते,’ असेही राव यांनी यावेळी सांगितले.एकूण १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत मुलांचे व मुलींचे प्रत्येकी ८ संघ उरण येथील जेएनपीटी मैदान व चेंबुर येथील आरसीएफ मैदानावर खेळतील. (क्रीडा प्रतिनिधी)
फुटबॉल विश्वचषक टर्निंग पॉइंट ठरेल
By admin | Published: May 03, 2017 6:33 AM