जयंत होवाळ मुंबई :
आदर्श फूटपाथ कसे असावेत, याविषयी मुंबई महापालिकेने २०१६ साली धोरण तयार केले असले तरी सध्याची पदपथांची अवस्था पाहता या धोरणाची ‘ऐशी की तैशी’ झाल्याचे चित्र आहे. फूटपाथ किती आकाराचे, कुठे असावेत, दिव्यांग वक्ती, गरोदर महिला, वृद्ध, लहान मुले यांना सहजपणे चालता यावे यादृष्टीने त्यांची रचना कशी असावी, व्हीलचेअर नेता येईल पण अन्य वाहनांची घुसखोरी होऊ नये म्हणून कोणती उपाययोजना असावी, अशी विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे या धोरणात नोंदवण्यात आली. मात्र या धोरणालाच हरताळ फासला गेला आहे. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर हा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबईची लोकसंख्या, प्रतिकिलोमीटर लोकसंख्येची घनता, वाहनांची संख्या, प्रतिचौरस मीटर क्षेत्रात वाहनांची संख्या, वर्दळीचे रस्ते आदी बाबी विचारात घेऊन ‘पादचारीस्नेही पदपथ’ असे २५ पानी धोरण पालिकेने तयार केले आहे. त्यात पदपथाचा आकार, उंची, उतार कसा असावा याचा ऊहापोह केला आहे.
ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, गरोदर महिला, दिव्यांग, लहान मुले यांच्या सोयीच्या दृष्टीने फूटपाथची रचना असावी. आवश्यक तिथे ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकडी असावीत. बाबा गाडीतून येणारी लहान मुले- त्यांच्या गाड्या तसेच व्हीलचेअर ने-आण करण्यासाठी दोन पोलच्या मध्ये आवश्यक जागा असावी. झाडे, कचरा, टपालपेटी, होर्डिंग, फेरीवाले, स्टॉल आदी अडथळे नसावेत.
असे आहे फूटपाथ धोरण- फूटपाथच्या रेलिंगची नित्यनियमाने देखभाल करावी. रेलिंग तुटलेले असतील तर ते बदलावेत. रेलिंगचा रंग उडाला असल्यास रंग द्यावा. वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी बोलार्ड अर्थात विशिष्ट अंतरावर पोल असावेत.- चालणे हा लोकांचा मूलभूत हक्क आहे. वाहतूक कोंडीमुळे खर्ची होणारा वेळ लक्षात घेता असंख्य लोक एक ते दीड किलोमीटरचे अंतर पायी जाणे पसंत करतात. हे अंतर विशेष करून घर ते रेल्वे स्थानक असे असू शकते. त्यांच्या सोयीसाठी फूटपाथ उपयुक्त ठरतात.- मॅनहोल शक्यतो फूटपाथवर नसावेत. आवश्यक असतील तर ते योग्य पद्धतीने झाकण्याची खबरदारी घ्यावी. अमुक मॅनहोलचे साइन बोर्ड ठेवावेत.
फूटपाथ समतोल असावेत, खाचखळगे नसावेत. अनावश्यक चढ-उतार नसावा. फूटपाथ ज्या ठिकाणी सुरू होतो, ते दर्शवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लाद्या असाव्यात. आतील भागातील लाद्या निसरड्या नसाव्यात. पावसाळ्यात पाणी साचून डबके निर्माण होऊ नये अशी रचना असावी.