फूटपाथ केवळ नावालाच; सांगा चालायचे कसे? कुर्ला, घाटकोपरमधील रहिवाशांचा प्रशासनाला सवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:35 IST2024-12-12T12:34:51+5:302024-12-12T12:35:54+5:30
कुर्ला, घाटकोपर पश्चिमेकडील बेस्ट बस स्थानकापासून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गापर्यंतच्या रस्त्यांवरील फूटपाथ फेरीवाल्यांसह लगतच्या दुकानदारांनी व्यापले आहेत.

फूटपाथ केवळ नावालाच; सांगा चालायचे कसे? कुर्ला, घाटकोपरमधील रहिवाशांचा प्रशासनाला सवाल!
सचिन लुंगसे
मुंबई :
कुर्ला, घाटकोपर पश्चिमेकडील बेस्ट बस स्थानकापासून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गापर्यंतच्या रस्त्यांवरील फूटपाथ फेरीवाल्यांसह लगतच्या दुकानदारांनी व्यापले आहेत. त्यामुळे सकाळ, सायंकाळी रेल्वे स्थानक गाठणाऱ्या तसेच स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना भर गर्दीत रस्त्यांवरूनच चालावे लागते. गर्दीच्या वेळी तर माणसांसोबत वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे कुर्ल्यासारख्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. येथे पोलिसांची गाडी तैनात असते. पोलिस असेपर्यंत ही सगळी व्यवस्था नीट असते. मात्र पोलिसांनी पाठ फिरवताच पुन्हा वाहतूक कोंडी होते.
‘एलबीएस’वर भिकारी, गर्दुल्ले
मुंबई व ठाण्याला जोडणाऱ्या एलबीएस मार्गावर सायनपासून बैलबाजारपर्यंतच्या फूटपाथवर भंगारवाल्यांसोबत भिकारी व गर्दुल्ल्यांनी कब्जा केला आहे. कुर्ला बस डेपो परिसरातील भंगारवाल्यांनी दुकानातील काही साहित्य फूटपाथवर ठेवल्याने चालायला जागा नाही. फूटपाथलगत लोखंडाचे साहित्य भरणारी अवजड वाहने २४ तास उभी असल्याने अरुंद झालेला रस्ता मोकळा नसतो. त्यामुळे कोंडी होते. नागरिकांना धड रस्त्यासह फूटपाथवरून चालता येत नाही. डबल पार्किंगही मोठी समस्या आहे. तर, रात्री गर्दुल्ल्यांचा वावर असल्याने फूटपाथवरून चालणे धोकादायक आहे.
महापालिका, पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई झाली की, दोन-तीन दिवस रस्ते मोकळे होतात. मात्र, असे रोज नाही. डबल पार्किंग, फूटपाथवरची फेरीवाल्यांची गर्दी प्रवाशांना नकोशी करते. सकाळी ८ ते ११ आणि रात्री ५ ते ९ या वेळेत तर स्टेशन परिसरात गर्दी हाताबाहेर गेलेली आते.
- संदीप पटाडे, घाटकोपर
फूटपाथ बिनकामाचे
घाटकोपरमध्ये वेलकम हॉटेल ते विद्याविहारकडे जाणाऱ्या रस्त्यासोबत ‘एलबीएस’कडे जाणाऱ्या रस्त्यावरीलफूटपाथ बिनकामाचे आहेत. तिकीट काउंटरला लागत विद्याविहारकडील रस्त्याच्या डाव्या बाजूला फूटपाथ असून तो नसल्यासारखे आहे. उजव्या बाजूचे फूटपाथ तीन फूटही रुंद नाहीत. त्यामुळे येथे गर्दी होत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते.
कुर्ल्यात नाईलाजाने रस्त्यांवरूनच ये-जा
बेस्ट मार्ग क्रमांक ३३२ च्या बस स्टॉपपासून कुर्ला डेपोपर्यंतच्या फूटपाथची अवस्था वाईट आहे. उजव्या बाजूला फूटपाथ नाही आणि डाव्या बाजूला असलेल्या अडीच-तीन फुटांच्या फूटपाथवर दुकानदारांची गर्दी आहे. पान, गादी, रद्दी, खारी, हॉटेलवाल्यांच्या गर्दीने पादचाऱ्यांना फूटपाथवर चालण्यास जागा शिल्लक नाही. यात भर म्हणून फुटपाथला लागून बसलेल्या फेरीवाल्यांसह अनधिकृत पार्किंगने रस्ता व्यापला आहे. कुर्ला मार्केट, ‘एल’ वॉर्डसह डेपोच्या सिग्नलपर्यंत हीच अवस्था आहे. डेपोपर्यंतच्या रस्त्यावर ‘मेट्रो-२ ब’चे खांब टाकण्यात आले असून, येथे सुरू असलेल्या कामाने रस्ता अरुंद झाला आहे.