लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बांधकामासाठी साफसफाई करताना वडाळ्यातील नागरिकांना ऐतिहासिक टेहाळणी बुरूज आढळला आहे. शीव आणि शिवडी किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगीज किंवा ब्रिटिशांनी तो उभारला असावा, असा अंदाज दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षे माती आणि झाडांच्या कचाट्यात सापडल्याने हा बुरूज नजरेआड झाला होता.
वडाळा येथील एका रस्त्यालगत बांधकामासाठी साफसफाई सुरू असताना स्थानिकांना तेथे एक पुरातन बांधकाम दिसून आले. आजूबाजूला वाढलेली झुडुपे साफ केल्यानंतर हा ऐतिहासिक टेहाळणी बुरूज दृष्टिपथात आला. इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, या बुरूजाची डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मुंबई हा सात बेटांचा आणि मोक्याचा प्रदेश. त्यामुळे येथे आपली सत्ता प्रस्थापित करण्याची अनेक राजवटींची धडपड सुरू होती. या सर्व शक्तींना रोखण्यासाठी, आपले किल्ले संरक्षित राखण्यासाठी फिरंगी (पोर्तुगीज) आणि ब्रिटिशांनी ठराविक अंतरावर टेहाळणी बुरूज उभारले होते. वडाळा येथे आढळलेला हा बुरूज शीव आणि शिवडी किल्ल्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला असावा, असा अंदाज सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी व्यक्त केला असे असले तरी कोणत्याही दफ्तरात या बुरुजाची नोंद आढळत नाही. पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून या बुरुजाबाबतच्या नोंदी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
.......................
बुरुजाची वैशिष्ट्ये...
- या टेहाळणी बुरुजाचा व्यास ४० ते ५० फूट इतका आहे. खाडीच्या बाजूचा भाग दगडी चिऱ्यांनी बांधला असून, त्यावरील बांधकाम चुन्याच्या सहाय्याने करण्यात आले आहे.
- या दोन मजली बुरुजावरून जंग्या आणि तोफांचा मारा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
- शिवाय बुरुजाच्या आत १२/६ फूट लांब आणि ८ फूट खोल पाण्याची टाकीही बांधण्यात आली आहे. टाकीच्या बाजूला पाण्याचा झराही आहे.
.............
कसे पोहोचाल?
हा टेहाळणी बुरूज वडाळा रेल्वे स्थानकापासून ३.३ किमी अंतरावर, तर पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या पुलानजीक आदर्श विद्यालय बसस्थानकाजवळ स्थित आहे. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने तेथे सहज पोहोचता येईल.
...........
(फोटोओळ - बांधकामासाठी साफसफाई करताना वडाळ्यातील नागरिकांना ऐतिहासिक टेहाळणी बुरुज आढळला.)