स्वच्छ मुंबईसाठी 'चलो इंदूर', महापालिका प्रशासन लागले कामाला

By जयंत होवाळ | Published: January 30, 2024 06:42 PM2024-01-30T18:42:19+5:302024-01-30T18:42:47+5:30

शाश्वत मुंबईचा दृष्टीकोन साध्य करण्याच्या दिशेने मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे.

For a clean mumbai municipal administration has started work | स्वच्छ मुंबईसाठी 'चलो इंदूर', महापालिका प्रशासन लागले कामाला

स्वच्छ मुंबईसाठी 'चलो इंदूर', महापालिका प्रशासन लागले कामाला

मुंबई: स्वच्छतेच्या बाबतीत देश  आणि राज्यात घसरलेल्या मुंबईच्या क्रमांकाला वर आणण्यासाठी आणि पुढील वर्षापर्यंत स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईला टॉप टेन राज्यांच्या यादीत आणण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्यासाठी अधिकारी थेट इंदूर गाठणार  आहेत. दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात इंदूरमध्ये घरोघरी होणारे  १०० टक्के कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वाहतूक नियोजन, कचरा विल्‍हेवाटीचे सुयोग्य नियोजन तसेच सार्वजनिक स्वच्छता आदींबाबतची माहिती घेतली जाणार आहे.  

मुंबई महानगरपालिका देशातील अग्रगण्य व महत्त्वाची महानगरपालिका असून स्वच्छ, सुंदर, हरित शहर म्हणून महानगरपालिकेची ओळख आहे. सार्वजनिक स्वच्छतेतही महानगरपालिका अग्रेसर आहे. स्वच्छता अभियानात देशात 'टॉप टेन' मध्ये येण्याची महानगरपालिकेची क्षमता आहे. त्‍यामुळे स्वच्छता अभियानात देशात पहिल्या दहामध्ये अर्थात 'टॉप टेन'मध्ये येण्‍यासाठी नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. या अंतर्गत घनकचरा व्यवस्‍थापन खात्यातील कर्मचाऱयांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने क्षमता बांधणी उपक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत  भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरला फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये दोन दिवसीय अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारची शैक्षणिक संस्था म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांची अभ्‍यास भेटीचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत मिशन २.० च्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत क्षमता बांधणी उपक्रम राबवून स्वच्छ, हरित आणि अधिक शाश्वत मुंबईचा दृष्टीकोन साध्य करण्याच्या दिशेने मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर काम करणारे सफाई कामगार व कनिष्ठ आवेक्षक हे कचरा संकलन यंत्रणेचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यांचे योगदान आणि कौशल्याचा थेट परिणाम कचरा संकलनाच्या कार्यक्षमतेवर आणि शहर स्वच्छतेवर होतो. शहराची स्वच्छता राखण्यात स्वच्छता कर्मचाऱयांचे, विशेषतः कनिष्ठ पर्यवेक्षकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. इंदूर अभ्‍यास भेटीमध्ये दैनंदिन कचरा संकलन, कचरा हाताळणी, विलगीकरणाची आव्हाने, कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा समस्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना, सफाई कामगारांची भूमिका, कचरा हाताळताना सुरक्षितता, सामुदायिक सहभाग आणि इंदूरच्या यशस्वी कचरा व्यवस्थापन प्रणालीतून मिळालेल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: For a clean mumbai municipal administration has started work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.