मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सातत्याने अतिरिक्त लोकल फेऱ्यांच्या मागणीवर जोर दिला आहे. शिवाय एसी लोकलचे तिकीट कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करतानाच महिलांसाठी विशेष लोकल सोडा, याकडे लक्ष वेधले आहे आणि हे जमत नसेल तर लोकलला अतिरिक्त डबे तरी जोडा, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर तुफान गर्दी असते. सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत तर लोकलमध्ये शिरता येत नाही. सकाळी ८ ते १० दरम्यान लोकल प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. त्यामुळे लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागतो. लोकलच्या फेऱ्या वाढविणे हाच उपाय आहे.- संतोष रबसे
महिला डब्यात पोलिस, सीसीटीव्ही कॅमेरे हवेत. लोकल फेऱ्या वाढविणे शक्य नसेल तर किमान डब्यांची संख्या वाढविली पाहिजे. रेल्वे मार्गाच्या परिसरातील अनधिकृत पार्किंग बंद केले पाहिजे. यामुळे सुरक्षा धोक्यात येते.- ॲड. स्वप्निल कदम
लोकलच्या फेऱ्या वाढविणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविले पाहिजेत. त्यामुळे लोकलमधून पडून होणारे अपघात थांबतील.- सचिन रणासिंग
रेल्वे प्रवाशांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. महिलांचा प्रवास सुखकर, सोपा झाला पाहिजे. महिलांसाठीच्या लोकल अधिक हव्यात आणि लोकलमधील गुंडगिरी बंद झाली पाहिजे. - रेखा मोरे
लोकलच्या फेऱ्या वाढविल्या पाहिजेत. एसी लोकलमुळे साध्या लोकलवर ताण येत आहे. ३० ते ४० मिनिटांच्या फरकाने लोकलला खूप गर्दी होत आहे. एसीचे तिकीट कमी केले पाहिजे. कारण एसीचा पास परवडत नाही. सायंकाळी वसई आणि नालासोपाऱ्याच्या लोकलच्या फेऱ्या चालविल्या तर त्याचा जास्त फायदा होईल.- चित्रा गावडे
रेल्वेने स्वतंत्र एसी लोकल सोडण्याऐवजी प्रत्येक लोकलला एसीचे २-३ डबे जोडल्यास ते पूर्ण क्षमतेने भरले जातील. प्रवाशांना नियमित एसी सोय उपलब्ध होईल. - विजय शिंदे