मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ५६ वर्षापूर्वी शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. त्याला एक नेता, एक विचार, एक मैदान आणि एक झेंडा असं संबोधित होतो. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे जहाल विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत होता. परंतु आज शिवसेनेचे २ मेळावे मुंबईत पाहायला मिळतायेत. दोन्ही बाजूला गर्दी होईल. परंतु एकनाथ शिंदे गर्दीचा रेकॉर्ड मोडतील असा विश्वास शिंदे गटाचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला.
रामदास कदम म्हणाले की, एकाच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ही आज का आली? शिवसेनेत उभी फूट पडली. सगळे शिवसैनिक राज्यातून येणारे आहेत हे वेदनादायी आहे. ५२ वर्ष आम्ही पक्षासाठी काम केले. पक्ष उभारणीत आमचाही खारीचा वाटा आहे. शिवसेनाप्रमुखांनी मला नेता केला होता. हे क्लेशदायक वाटतं. उद्धव ठाकरेंनी दोन पाऊलं मागे घेतली असती, आमदारांचे ऐकून घेतले असते. वेदना ऐकल्या असत्या तर आज हे २ मेळावे घ्यावे लागले नसते. मंत्र्याला, आमदार, खासदारांना भेटायला वेळ नसणारे आज सगळ्यांना भेटतायेत असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
तसेच मला कुणावर हल्लाबोल करण्याची आवश्यकता नाही. मला शिवसेनेची तोफ म्हणून संबोधतात पण ही तोफ उद्धव ठाकरेंनी बंद केली होती. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवाजी पार्क असो वा अन्य ठिकाणी माझी भाषणं बंद केली होती. मला बाजूला केले गेले. त्याचे उत्तर आजपर्यंत मला मिळाले नाही. त्याचे उत्तर मी शोधतोय. एकमेकांवर तोफ डागणं एवढेच काम नाही. सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्राचा विकासही समोर आहे असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
दरम्यान, गद्दार, खोके ऐवजी तुम्ही अडीच वर्षात काय केले हे ठाकरेंनी सांगावे. मी सगळ्या आमदारांना गुवाहाटीतून आणायला तयार होतो. गद्दारीची व्याख्या काय हे लोकांना कळू दे. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरला पण का हे सांगणार आहे. राष्ट्रवादीला सोडायला उद्धव ठाकरे तयार नव्हते. ५० आमदार, १२ खासदार, शेकडो नगरसेवक का सोडून जातात त्याचे आत्मपरिक्षण करायला हवेत. कोणाचे कोथळे तुम्ही बाहेर काढणार? ती भाषा बाळासाहेबांना शोभायची असा टोलाही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"