Join us

महायुती महाविकास आघाडीची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण; दोन्ही उमेदवारांचा पदयात्रांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:41 AM

उत्तर पूर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी दुसऱ्या फेरीतील प्रचाराला सुरुवात केली आहे.

मुंबई : उत्तर पूर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी दुसऱ्या फेरीतील प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांनी पहिल्या फेरीत जवळपास सगळा मतदारसंघ पिंजून काढला आहे. दोन्ही उमेदवारांनी पदयात्रांवर भर दिला होता. 

दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटीगाठी, समाजातील विविध घटकातील मान्यवर आणि विविध समाज घटकांसोबत बैठका असे नियोजन असेल. कोटेचा  मुलुंडचे, तर पाटील भांडुपचे रहिवासी आहेत. हे विभाग दोघांचेही बालेकिल्ले असून, त्या भागात त्यांचे संघटन आधीपासून आहे. 

१) प्रचार फेरीदरम्यान कोटेचा यांनी मुलुंड येथील प्रस्तावित पक्षी पार्क, क्रीडा संकुल आणि पवई तलावातील सांडपाणी रोखण्यासाठी प्रक्रिया केंद्र  हे प्रकल्प मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

२) दुसऱ्या टप्प्यात महायुती मतदारसंघातील ज्या ठिकाणी ज्या समाजाचे प्राबल्य आहे, त्या समाजातील मान्यवरांसोबत बैठक घेणार आहेत. महायुतीची प्रचाराची दुसरी फेरी निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण झाली आहे.

कुणाचा कशावर असणार भर ?

१) संजय दिना पाटील यांनी विविध मंडळांना भेटी देण्यावर भर दिला होता. त्याच बरोबर विशेषकरून संध्याकाळी विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघाना भेटी देण्यावरही भर दिला आहे. एरवीच्या पदयात्रेत फक्त मतदारांना अभिवादन केले जायचे. 

२) दोन्ही उमेदवारांनी यावेळी मात्र पदयात्रा सुरू असताना थेट संवादावर भर दिला आहे. सध्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विविध भागात मेळावे घेऊन संघटन आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून ‘फिडबॅक’ घेऊन ज्या भागात आपली ताकद कमी आहे, तिथे जोर लावण्यासाठी रूपरेषा निश्चित केली जात आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४