‘वेस्टर्न’आवडे मुंबईकरांना, सलग तिसऱ्या महिन्यात घरविक्री वाढली, पश्चिम उपनगरांना प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 06:25 AM2023-09-01T06:25:52+5:302023-09-01T06:26:00+5:30
विशेष म्हणजे, जून, जुलै आणि आता ऑगस्ट अशा सलग तीन महिन्यांत मुंबईत दरमहा १० हजारांहून जास्त घरांची विक्री झाली आहे.
मुंबई : नुकत्याच सरलेल्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत एकूण १० हजार ४५५ मालमत्तांची (निवासी आणि व्यावसायिक) विक्री झाली असून, त्यामुळे सरकारच्या तिजोरीत ७७६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे, जून, जुलै आणि आता ऑगस्ट अशा सलग तीन महिन्यांत मुंबईत दरमहा १० हजारांहून जास्त घरांची विक्री झाली आहे.
बांधकामाचे सर्वाधिक नवे प्रकल्प हे पश्चिम उपनगरांतील असून त्यांची टक्केवारी ५५ टक्के इतकी आहे. पश्चिम उपनगरांत सुरू झालेल्या दोन मेट्रो सेवांमुळे ग्राहकांनी त्या विभागाला पसंती दिल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
चालू वर्षात...
जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत मुंबईत एकूण ८२ हजार २६३ घरांची विक्री झाली
या माध्यमातून सरकारला ७२४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
आगामी काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरांच्या विक्रीचा आलेख वाढताना दिसेल, असा अंदाज आहे.
पूर्व उपनगरांकडे ग्राहकांची पाठ
पश्चिम उपनगरांच्या तुलनेत पूर्व उपनगरांकडे ग्राहक पाठ फिरवताना दिसतात
एप्रिल ते जून २०२२ या कालावधीच्या तुलनेत एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत पूर्व उपनगरांतील घरखरेदीत ६१ टक्क्यांवरून ३८ टक्के अशी घट झाली आहे.
वन बीएचके घरांची निर्मिती घटली
एकीकडे परवडणाऱ्या दरांतील घरांची चर्चा होत असली तर वास्तव मात्र भिन्न असल्याचे दिसून येते. २०२१ व २०२२ या वर्षात जे बांधकाम प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली त्यापेक्षा २०२३ मध्ये प्रकल्प उभारले जात आहेत त्यामध्ये वन-बीएचके घरांच्या निर्मितीचे प्रमाण ५ टक्क्यांनी घटले आहे. २ व ३ बीएचके आणि त्यापेक्षा मोठ्या आकारमानांच्या घरांच्या निर्मितीकडे विकासकांचा कल आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ऑगस्टमध्ये ज्या घरांची विक्री झाली त्यात सर्वाधिक विक्री ही मोठ्या व आलिशान घरांची होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० लाख ते दीड कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण हे यंदा ४३ टक्के अधिक असून दीड कोटी ते अडीच कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण हे २७ टक्के अधिक आहे. अडीच कोटी रुपये व त्यावरील घरांच्या विक्रीचे प्रमाण हे २१ टक्के अधिक आहे.