राम नाईक यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान; आशिष शेलार यांचे मत
By मनोहर कुंभेजकर | Published: March 10, 2024 04:00 PM2024-03-10T16:00:06+5:302024-03-10T16:00:49+5:30
‘सामाजिक क्षेत्रातील अपवादात्मक व अतिविशिष्ट जनसेवे’साठी राम नाईक यांना पद्मभूषण सन्मान घोषित झाला.
मुंबई-“‘बॉम्बे’, ‘बंबई’चे ‘मुंबई’ करणारे, मुंबईचे पर्यावरण चांगले रहावे यासाठी सीएनजी आणणारे. सुखकर रेल्वे प्रवासासाठी ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळ’ स्थापन करणारे, पहिली महिला गाडी सुरू करणारे, मुंबईतील घरा - घरात पाईपने गॅस पुरवणारे राम नाईक यांना ‘पद्म भूषण’ देऊन मा. राष्ट्रपतींनी सच्च्या मुंबईकराचा सन्मान केला आहे”, असे भावोद्गार भाजपा मुंबईचे अध्यक्ष व आमदार अँड. आशिष शेलार यांनी काल रात्री बोरीवलीत काढले. ‘पद्म भूषण’ सन्मान घोषित झाल्याबद्दल ज्येष्ठ भाजप नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचा काल मुंबईकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी शेलार बोलत होते.
‘सामाजिक क्षेत्रातील अपवादात्मक व अतिविशिष्ट जनसेवे’साठी राम नाईक यांना पद्मभूषण सन्मान घोषित झाला. साठ वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ राजकीय- सामाजिक कारकिर्दीत बोरीवली विधानसभा क्षेत्रातून त्यांनी निवडणुकीच्या राजकारणास प्रारंभ केला. तिथून सलग तीनदा आमदार व त्यानंतर सलग पाचदा खासदार म्हणून ते निवडून आले. सलग आठ निवडणुका जिंकणारे राम नाईक हे मुंबईतील एकमेव राजकीय व्यक्तिमत्व. एवढेच नव्हे तर संपूर्ण राज्यात बोरीवली ही एकमेव विधानसभा जिथून भाजपा स्थापनेपासून आजपर्यंत सतत भाजपाच निवडून येत आहे. या सर्वांचे औचित्य साधून काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बोरिवली येथे राम नाईक यांचे नागरी अभिनंदन करण्यात आले.
“माझ्यासारख्या झोपडपट्टीतील चळवळ्या तरुणाला आपल्या कामामुळे आपलंसं करून त्याला केवळ कार्यकर्ता बनवून न थांबता नगरसेवक, आमदार, खासदार बनविणारे आमचे आदर्श म्हणजे राम नाईक! त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ‘पद्म भूषण’ सन्मान राम नाईक यांना देण्यात येत आहे. मुंबईत आजवर अनेक राजकीय नेते झाले पण आपल्या जनसेवेसाठी ‘पद्म भूषण’ मिळालेले राम नाईक हे एकमेव आहेत,” असे यावेळी बोलताना स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले.
“युती धर्म म्हणजे काय याचा आदर्श नमुना म्हणजे राम नाईक! भाजप- शिवसेना युती म्हणजे निव्वळ जागावाटप नव्हे, तर परस्परांसाठी तिथल्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामही कसे करायचे याचा आदर्श राम नाईक यांनी घालून दिला. आज त्यांचे सर्वांनी अनुकरण करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन यावेळी बोलताना शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले.
“एकाच वेळी राष्ट्रीय आणि स्थानिक दोन्ही पातळ्यांवर प्रभावी व पथदर्शक काम करणारा नेता म्हणून श्री राम नाईक सदैव ओळखले जातील. खासदार निधी सुरू करणे असो किंवा घरगुती गॅस जोडणीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या देशातील 1.10 कोटी कुटुंबांसह 3.50 कोटी कुटुंबांना गॅस जोडण्यात देत असतानाच वसईतील समुद्राने वेढलेल्या अर्नाळा किल्ल्यावरील पाच-सहाशे कुटुंबांना समुद्रात टॉवर टाकून श्री राम नाईक वीज देतात, रेल्वेमंत्री झाल्यावर उपनगरी क्षेत्र डहाणूपर्यंत वाढविणाऱ्या राम नाईक यांनी त्याही आधी विरोधी पक्षात असताना विरार - डहाणू शटल सुरू केली जिचा आजही प्रवासी ‘राम नाईक शटल’ असाच उल्लेख करतात, आम्हा कार्यकर्त्यांसाठी आदर्श म्हणजे राम नाईक!,” असे भावोत्कट भाषण यावेळी दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी केले.
“मी कृतकृत्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि त्यानंतर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार यामुळे देशसेवेसाठी राजकारण - समाजकारण हे ध्येय मानून मी जगलो. ‘अंत्योदय’ हे राजकारणाचे लक्ष्य असले पाहिजे या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संदेशाचे पालन करीत आलो म्हणूनच एकाच वेळी राजकीय काम आणि कुष्ठपीडित, मच्छीमार, अणू ऊर्जा प्रकल्प पीडित यांच्यासाठीही काम केले. सदैव करीत राहीन.”, अशा शब्दात राम नाईक यांनी आपल्या सत्काराला उत्तर दिले.
यावेळी आमदार सर्वश्री योगेश सागर, सुनील राणे, प्रकाश सुर्वे, अमित साटम, विद्या ठाकूर यांच्यासह अनेक जनप्रतिनिधीही या समारंभात सहभागी झाले होते. श्री नाईक यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या जनसेवा बँकेचे अध्यक्ष अँड. जयप्रकाश मिश्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक डॉक्टर विष्णू वझे यांचीही यावेळी भाषणे झाली. माजी नगरसेवक विनोद शेलार यांनी सन्मानपत्र वाचन केले. भाजपा उत्तर मुंबईचे अध्यक्ष गणेश खणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष मेढेकर यांनी आभार प्रदर्शन केले.