मुंबई - आधीच वाढलेली विमान प्रवाशांची संख्या आणि त्यात आगामी काळात असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या या पार्श्वभूमीवर एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीने आपल्या विमान फेऱ्यांमध्ये २५ टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांत २५ टक्के वाढ होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान फेऱ्यांत २० टक्के वाढ करण्याची योजना कंपनीने आखली आहे. यानुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमानांच्या ५५ अतिरिक्त फेऱ्या होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर १९ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. आंतरराष्ट्रीय मार्गावर अबुधाबी, दमाम, जेद्दा, शारजा येथे अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. तर देशांतर्गत मार्गावर अयोध्या, बंगळुरू, हैदराबाद, कोलकात्ता, कोची, मंगळुरू, तिरुवनंतपुरम, वाराणसी येथे अतिरिक्त फेऱ्या करण्याचे कंपनीने योजिले आहे.