‘त्या’साठी शिंदेंना हवा १६ आकडा; उर्वरित पाच खासदारांना संधीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:02 AM2024-03-30T10:02:47+5:302024-03-30T10:03:11+5:30
शिंदेंकडे असलेल्या १३ खासदारांपैकी त्यांनी सात जणांना उमेदवारी दिली, एकाचे तिकिट कापले.
मुंबई : भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात खेचाखेची सुरू असलेल्या लोकसभेच्या तिन्ही जागा आपल्याकडे खेचून आणायच्या असतील आणि सोबतच्या उर्वरित पाचही खासदारांचे मतदारसंघही राखायचे असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:कडे किमान १६ जागा खेचून आणाव्या लागतील. त्याची शक्यता कमी असल्याने त्यांच्यावर त्यागाची वेळ येणार हे जवळपास स्पष्ट आहे.
शिंदे यांनी त्यांच्यासोबतच्या सात खासदारांना आतापर्यंत उमेदवारी दिली आहे. पाच खासदारांना उमेदवारी देणे बाकी आहे. त्यातील नाशिकच्या जागेसाठी त्यांच्यात आणि अजित पवार गटात जबरदस्त खेचाखेची सुरू आहे. पालघरच्या जागेवर त्यांच्यात आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उत्तर-पश्चिमची जागा भाजपला हवी आहे. त्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.
शिंदेंकडे असलेल्या १३ खासदारांपैकी त्यांनी सात जणांना उमेदवारी दिली, एकाचे तिकिट कापले. एकूण आठ उमेदवार त्यांनी जाहीर केले. आता उर्वरित पाचही खासदारांना संधी द्यायची तर शिंदे यांना महायुतीत किमान १३ जागा मिळवाव्या लागतील आणि ज्या तीन जागांसाठी ते आग्रही आहेत तेही मिळवायचे तर त्यांना १६ जागा मिळवाव्या लागतील.
उमेदवारी मिळालेले शिंदेंचे खासदार
प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे, सदाशिव लोखंडे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे
प्रतीक्षेतील खासदार
भावना गवळी, हेमंत गोडसे, गजानन कीर्तीकर, राजेंद्र गावित, श्रीकांत शिंदे.
या जागांसाठी संघर्ष?
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा जवळपास भाजपला गेली असे मानले जात आहे. ठाणे ही जागा मिळावी असा त्यांचा आग्रह आहे, मात्र भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. नाशिकमध्ये शिंदे गट अन् अजित पवार गट भिडले आहेत, त्यात ही जागा खेचून नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.