मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या येत्या सत्रातील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे मुंबई व उपनगरातील स्वायत्त महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, अशा सूचना मुंबई उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी केल्या आहेत. त्यामुळे येत्या सत्रात शहरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेत ऑनलाईन, ऑफलाईनचा गोंधळ राहणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रवेश पद्धतीमुळे गुणदान प्रक्रियेत समानता राखली जाईल, असे मत मुंबई उच्च शिक्षण विभागामार्फत मांडण्यात आले आहे. त्याचवेळी या सूचना बंधनकारक नसल्याचेही उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
उच्च शिक्षण विभागाच्या उन्हाळ्याच्या सत्र परीक्षा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहेत. त्यात कोरोनाच्या नियमांतही शिथिलता आल्याने अनेक स्वायत्त महाविद्यालयांकडून परीक्षांचे आयोजन प्रत्यक्ष पद्धतीने होणार आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचा ऑफलाईन परीक्षांना विरोध होत असून, या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व्हाव्यात, यासाठी अनेक पत्रे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मंत्री उदय सामंत यांना पाठविण्यात आली आहेत. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्याही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने ऑफलाईन व ऑनलाईन अशा वेगळ्या परीक्षा पद्धतीमुळे गुणांत समानात राखली जाणार नाही आणि अंतिम निकालावर याचा परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाकडून स्वायत्त संस्था आणि महाविद्यालयांना परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची विनंती केल्याची माहिती सहसंचालिका सोनाली रोडे यांनी दिली.
शहरातील सेंट झेविअर्स, मिठीबाई, जय हिंद, एनएम, सोफिया अशा काही स्वायत्त महाविद्यालयांनी परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीकडून या स्वायत्त संस्थांना स्वतःची परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम ठरविण्याचे अधिकार दिला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा ऑफलाईन परीक्षा पद्धतीस विरोध होत असल्याने आता या स्वायत्त संस्थांचे व्यवस्थापन नेमका काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.