मुंबईतील रस्त्यांचे काम आता करणार कोण ? पाचव्यांदा निविदा काढूनही कंत्राटदार पुढे येईना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:15 AM2024-04-19T11:15:49+5:302024-04-19T11:18:24+5:30
शहर भागातील रस्त्यांची कामे आता पावसाळ्यापर्यंत रखडली असून पालिकेला रस्त्यांसाठी कंत्राटदारच मिळेना, अशी स्थिती झाली आहे.
मुंबई : शहर भागातील रस्त्यांची कामे आता पावसाळ्यापर्यंत रखडली असून पालिकेला रस्त्यांसाठी कंत्राटदारच मिळेना, अशी स्थिती झाली आहे. शहर भागातील रस्ते कामांसाठी पालिकेचा निविदांचा फेरा सुरूच असून पहिल्या टप्प्यातील रस्त्यांसाठी पाचव्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.
मुंबईतील रस्त्यांचे काम आता करणार तरी कोण हा प्रश्न आहे. शहर भागातील ६५ किलोमीटरच्या रस्ते काँक्रिटीकरणासाठी चौथ्यांदा मुदतवाढ देऊनही पालिकेला प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी पुन्हा ७ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या कामांसाठी पाच नामांकित कंत्राटदारांची निवड केली व जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले होते.
जानेवारी २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन केले होते. मात्र प्रत्यक्षात ही कामे सुरूच होऊ शकली नाहीत. त्यामुळे पालिकेने नवीन कंत्राटदार नेमण्याकरिता निविदा मागवल्या आहेत. या कामासाठी निविदा मागवण्याची आता ही पाचवी वेळ आहे.
खड्डेमुक्त प्रवास शक्य?
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर अल्पावधीतच रस्ते खड्डेमय होत असल्याने पालिका टीकेचे लक्ष्य बनते. सुरुवातीच्या पावसातच रस्त्यांची चाळण होत असल्याने पावसात मुंबईकरांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबईतील रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र त्यासाठी आता ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना खड्डेमुक्त प्रवास सध्या तरी अशक्यच दिसत आहे.
खर्च वाढला; पण कंत्राटदार मिळेना-
रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड (आरएसआयएल) या कंत्राटदाराला १२३४ कोटी रुपयांचे काम देण्यात आले होते. मात्र, या कंत्राटदाराने कामे सुरू न केल्यामुळे त्यांना वारंवार समज देण्यात आली होती. तसेच दंडही ठोठावला. त्यानंतर नव्याने काढलेल्या निविदेमध्ये या कामाचा खर्च वाढला असून शहर भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा अंदाजित खर्च १३६२ कोटी रुपयांवर गेला आहे.