Join us

नेहरू सेंटरमध्ये प्रथमच 'लावणी नृत्य कार्यशाळा', माया जाधव मोफत देणार धडे 

By संजय घावरे | Updated: May 1, 2024 18:52 IST

महाराष्ट्राची शान असलेली लावणी जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी आजही दाद मिळवण्यात यशस्वी होते.

मुंबई - महाराष्ट्राची शान असलेली लावणी जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी आजही दाद मिळवण्यात यशस्वी होते. अलीकडच्या पाश्चात्य डान्सच्या काळात काहीशी मागे पडलेली लावणी नेहरू सेंटरच्या पुढाकाराने पुन्हा जोर धरणार आहे. नृत्यांगना माया जाधव लावणीचे मोफत धडे देणार आहेत. वरळी येथील नेहरू सेंटरच्या वतीने वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मे महिन्यात नवकलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मागील बऱ्याच वर्षांपासून इथे आयोजित केल्या जाणाऱ्या अभिनय, कथ्थक नृत्य, वादनाच्या कार्यशाळांनी कलाकार घडवण्याचे काम केले आहे. 

यंदा मात्र लावणी नृत्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नव कलाकारांमध्ये लावणीबाबत असलेले आकर्षण लक्षात घेऊन नेहरू सेंटरमध्ये 'तूच माझी सखी' हि कार्यशाळा घेण्यात येणार आहे. अभिनेत्री, लावणी नृत्यांगना माया जाधव यांचे मार्गदर्शन या शिबिराला लाभणार आहे. बासरी वादनासाठी पं. सुनील कांत गुप्ता यांचे, कथ्थक नृत्यासाठी बिरजू महाराज यांच्या शिष्या सश्वती सेन यांचे, तर अभिनय कार्यशाळेसाठी दिग्दर्शक, अभिनेते अभिजित झुंजारराव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. लावणी नृत्य कार्यशाळेचे सूत्रसंचलन नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका कविता कोळी करणार आहेत. 

नर्तक, नृत्यदिग्दर्शक सचिन गजमल आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका, अभिनेत्री विजया कदम यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. या सर्व कार्यशाळा विनामूल्य आहेत. १३ ते १७ मे यादरम्यान  नेहरू सेंटरच्या विविध सभागृहांमध्ये होणार आहेत‌. १७ मे रोजी रंगभूषा, वेशभूषा, वाद्य, प्रकाश योजना यांच्यासह शिबिरार्थींना घेऊन कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिबिरार्थींना नेहरू सेंटर येथे किंवा समन्वयक प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम संपर्क साधणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :मुंबईनृत्य