मुंबई – शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली होती. मनी लॉन्ड्रिंग आरोपाखाली ही शोधमोहिम सुरू केली. मागील २४ तासांपासून यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील निवासस्थानी आयकर विभागाची झाडाझडती सुरूच असल्याचं समोर येत आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास आयकर विभागाचे पथक यशवंत जाधव यांना घेऊन जाणार असल्याचे समजताच शिवसैनिकांनी जाधव यांच्या घराबाहेर गर्दी केली. आयकर विभाग तसेच भाजपा विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना समजावून माघारी पाठवले आहे. जाधव यांच्या निकटवर्तीयांवर मुंबईत २५ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. यावेळी अनेक महत्त्वाचे दस्तावेज प्राप्तिकर विभागाने ताब्यात घेतले. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
काय आहे प्रकरण?
जाधव दाम्पत्याने कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतून समोर आले होते. यामिनी यांनी प्रधान डिलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. मात्र, ही शेल कंपनी असून, पुढे यातूनच १५ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आली आहे का? याबाबत प्राप्तिकर विभाग अधिक तपास करत आहे.
कोण आहेत यशवंत जाधव?
सामान्य शिवसैनिक ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा यशवंत जाधव यांचा गेल्या २ दशकाचा राजकीय प्रवास आहे. आक्रमक भूमिकांमुळे सलग ४ वेळा त्यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. २००२ मध्ये नगरसेवक पदाची संधी हुकल्यानं त्यांनी पक्षाच्या उपविभागप्रमुख पद सांभाळले. २००७ मध्ये पक्षाने पुन्हा संधी देताच ते निवडून आले. २००७ ते २०१२ या काळात ते उद्यान व बाजार समितीचे अध्यक्ष होते.
२०१७ मध्ये यशवंत जाधव तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. जाधव यांच्यावर निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप झाला होता. मध्यंतरी त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने अडचणीत आले होते.