मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटा कडून मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी आपला तगडा उमेदवार मतदारसंघात उभा करण्याची जोरदार तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पक्षातील जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा वायकर, माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत या राजकीय नेत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते शरद पोंक्षे, सचिन खेडेकर आदी मराठी कलाकारांची चाचपणी केल्याचे समजते. वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ते किंवा त्यांच्या पत्नीसाठी तिकीट मागितल्याचे समजते.
वायकर यांच्याशी देखिल उमेदवारी बद्धल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती,पक्षा तर्फे वायकर किंवा त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा सुद्धा सर्व्हे सुरू असल्याचे समजते. मात्र जोगेश्वरीच्या जेष्ठ माजी नगरसेविका उज्वला मोडक, येथील भाजप उपाध्यक्ष व राणे समर्थक दत्ता शिरसाट व इतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा त्यांना कडाडून विरोध आहे. तसेच त्यांनी दि,10 मार्चला शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्याच्या सोबत फक्त तीन महिला पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला होता. आणि आजही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील तमाम शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे वायकर यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या समोर कितपत निभाव लागेल अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये आहे.
उत्तर-पश्चिम मतदारसंघात मराठी किंवा अमराठी यापैकी कोणाला सर्वाधिक पाठिंबा मिळू शकतो, याचं सर्वेक्षण शिंदे गटाकडून करण्यात आले आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या संजय निरुपम यांची चाचपणी देखिल केली होती. मात्र निरुपम हा अमराठी चेहरा असल्याने शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध असून मराठी चेहऱ्याला उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे
माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याशी उमेदवारी बद्धल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला होता. डॉ.दीपक सावंत हे 18 वर्षे विधानपरिषद सदस्य व मेल्ट्रॉनचे चेअरमन होते, तर शिवसेना भाजपच्या युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मंत्रालयात त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते सध्याच्या युती सरकार मध्ये कुपोषण निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत.
त्यामुळे पक्षाच्या कोणत्या नेत्याला उमेदवारी द्यावी,का मराठी सेलिब्रेटीला उमेदवारी द्यावी याचा निर्णय लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.