Join us

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणासाठी लगबग; विस्तारावर दिल्लीत झाले शिक्कामोर्तब?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 6:28 AM

मागील ३९ दिवस राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचेच मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे.

- दीपक भातुसे   मुंबई : स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यांच्या मुख्यालयावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे यासाठी त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे समजते. जिल्ह्याच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. आता स्वातंत्र्य दिन तोंडावर आला असतानाही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. 

मागील ३९ दिवस राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचेच मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला नाही आणि पालकमंत्री नियुक्त केले नाहीत, तर जिल्हा मुख्यालयावर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे लागेल. आधीच मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिल्यामुळे शिंदे सरकारवर टीका होत आहे. त्यातच ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करावे लागले, तर सरकारवर पुन्हा टीका होऊ शकते. त्यामुळेच १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून ही टीका टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे समजते.   

पहिल्या टप्प्यात १६ ते १७ मंत्री?

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील खटल्यांची ८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात  होणारी सुनावणी आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यावेळी  सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल तो लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार करण्याची रणनीती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आखल्याचे समजते. या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या टप्प्यात १६ ते १७ मंत्र्यांचा समावेश असेल, अशी चर्चा आहे.विरोधकांकडून टीकामंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधकांकडून शिंदे गट आणि भाजपवर टीका केली जात आहे. आतापर्यंत २० वेळा बोलूनही शिंदे सरकारला मुहूर्त मिळेना, अशा शब्दांत विरोधकांकडून सरकारची खिल्ली उडवली जात आहे.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस