लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पश्चिम रेल्वे मार्गावर खार-गोरेगाव स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे स्थानके प्रवाशांनी खचाखच भरली होती. रेल्वे प्रशासनाचे नियोजन फोल ठरल्याने अर्धा तास उशिराने रेल्वे गाड्या धावत होत्या. यामुळे चाकरमानी, विद्यार्थी व अन्य प्रवाशांना वेळेवर इच्छितस्थळी जाता आले नाही, तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकात मालगाडीचे इंजिन बिघडल्याने तासभर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचा ताटकळत बसावे लागले.
पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान लोकलच्या तब्बल २ हजार ५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी प्रवाशांचे झालेले हाल पाहता शनिवारी तरी रेल्वे प्रशासनाकडून निश्चित उपाययोजना होणे अपेक्षित होते, मात्र शनिवारी तीच अवस्था पाहावयास मिळाली. शनिवारी दिवसभरात २५६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. परिणामी, प्रवाशांची गर्दी वाढू लागली. दादर रेल्वे स्थानकात अर्धा तास रेल्वे नव्हती, अशी तक्रार प्रवाशांनी केली. बोरिवली स्थानकावर १२ वाजून चार मिनिटांची एसी लोकल होती; पण ही लोकल रद्द झाल्याची अनाउन्समेंट साडेबारा वाजता करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दादर, अंधेरी, बांद्रा, बोरिवलीसह इतर सर्वच स्थानकांत प्रवाशांची गर्दी दिसून आली आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकात मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील गाड्यांना फटका बसला.
नियोजनाच्या अभावामुळे गेले काही दिवस लोकल सातत्याने लेट असून, प्रवाशांचे हाल होत आहेत; त्यामुळे ब्लॉकचा कालावधी वाढवावा लागला. पश्चिम रेल्वे मार्गावरही नियोजनाचा अभाव दिसून येतो. लोकल वाहतुकीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेत अनुभवी विभागीय व्यवस्थापकाची गरज आहे. गर्दीबाबत रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी अन्यथा प्रवाशांचा उद्रेक होईल.-नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ
सहाव्या मार्गिकेचे काम करताना केवळ कामाचे नियोजन केले. पण प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले. रेल्वे प्रशासनाने एल्फिस्टन स्थानकातील चेंगराचेंगरीतून धडा घेतल्याचे दिसत नाही. रेल्वे केवळ कामाला प्राधान्य देते.- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद