Join us

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस करणार वेशांतर, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची आता खैर नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 11:12 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये असलेली खुन्नस पाहता मतांसाठी गुन्हेगारांची मदत घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये असलेली खुन्नस पाहता मतांसाठी गुन्हेगारांची मदत घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईपोलिस साध्या वेशात आणि गरज पडल्यास वेशांतर करूनही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर नजर ठेवतील, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

स्लम पॉकेट्सवर अधिक नजर?

मतदारांची अधिक संख्या ही विशेषता झोपडपट्टी परिसरात असते. त्याठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता जास्त असल्याने पोलिस वेशांतर करून पेट्रोलिंग करतील. कधी फेरीवाला तर कधी रिक्षावाला अशा वेशांत येऊन आवश्यक कारवाया करतील.

बंदूकच काय, स्क्रू ड्रायव्हरही हस्तगत-

मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांत देशी कट्टे, पिस्तूल, जिवंत काडतुसांसह सुरा, चाकू आणि स्क्रू ड्रायव्हर घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्याचाही गाशा गुंडाळला आहे. गेल्यावर्षी याच काळात शहरातून ३९१ अवैध शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत.

वॉरंट, हमीपत्र आणि हद्दपार...

१) गेल्या लोकसभा निवडणुकीत पोलिसांनी आचारसंहितेच्या काळात अभिलेखावरील १९ हजारांहून अधिक गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. २०४ जणांना शहरातून हद्दपार करत विविध खटल्यांत अनुपस्थित राहिल्याबद्दल पाच हजार आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले.

२) गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांकडून फौजदारी दंडसंहितेतील तरतुदींनुसार हमीपत्र घेण्यात आले. ५ हजारांहून अधिक जणांना नोटिसा, कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सूचना दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर साडेदहा लाख रुपयांचा अवैध दारूसाठा, १०. ५१ लाखांची बेहिशोबी रोकड आणि तब्बल ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले होते.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४पोलिस