मनोहर कुंभेजकर, मुंबई : महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा घटक पक्ष आहे. बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. आमच्यात 48 जागांवर चर्चा पूर्ण झाली. कोण कुठून लढू शकेल याचा साधारण आराखडा ठरला असून कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कालच मुंबईत शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर महाविकासआघाडीची बैठक पार पडली, या बैठकीत तीनही पक्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.यामध्ये महाराष्ट्रात ठाकरे गट २० जागा, काँग्रेस १८ जागा, तर शरद पवार गट १० जागा लढविण्याची शक्यता असून वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या २ जागा दिल्या जाऊ शकतात.
ठाकरे गट मुंबईत या चार जागा लढणार?
शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गट मुंबईत ४ जागा लढण्याच्या तयारीत आहे.दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई या जागांवर ठाकरे यांची शिवसेना आगामी लोकसभानिवडणूक लढण्याची शक्यता आहे.दुसरीकडे जर वंचित बहुजन आघाडी बरोबर आल्यास ईशान्य मुंबई ही जागा वंचितला सोडली जाण्याची शक्यता देखिल वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत,दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना नेते व लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई,उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर,ईशान्य मुंबईतून माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्याने लोकमतला दिली.