मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊन ही निवडणूक प्रचारात हायटेक होणार आहे. आता विविध राजकीय पक्ष, नेते आणि उमेदवारांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही करण्यात येत आहे. त्यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालांनुसार, फेक कंटेट, व्हाॅइस क्लोनिंग, एआय इन्फ्ल्युएर्न्स, डिपफेक व्हिडीओ, डेटा हॅकिंग, अशा वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येत आहे. यात भाजप आघाडीवर आहे.
आंतरराष्ट्रीय प्राइस वॉटरहाउस कूपर्स नावाच्या कंपनीने केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, देशात गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोशल मीडिया आणि टीव्ही जाहिरातींचा वापर केला गेला होता. आता पुढच्या निवडणुकांमध्ये चॅटजीपीटी, गुगल बार्ड आणि अशाच इतर एआय टूल्सचा वापर केला जात आहे.
‘डेटा’ ही संपत्ती असणे या युगात आपण सध्या जगतोय. प्रत्येक व्यक्तीबद्दल एक- दोन नाहीतर तब्बल चार हजारांहून अधिक आवडी- निवडीचे डेटा पॉइंट्स आता उपलब्ध झालेले आहेत. याचा वापर करून प्रत्येकासाठीचा प्रचार वेगवेगळा करण्यात येत आहे, कोणत्याही तंत्रज्ञानाच्या विश्वात मतदाराचा डेटा म्हणजे डिजिटल फूटप्रिंट महत्त्वाचे आहे. भारतातील निवडणुकांसाठीचा प्रचार करणाऱ्या एका बहुदेशीय कंपनीच्या मते २०२४ निवडणुकांसाठीचे प्रचाराचे सगळ्या पक्षांचे एकत्रित बजेट हे साधारण साठ दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढे असणार आहे, यात अधिक प्रमाण एआय केंद्रित प्रचाराचा असणार आहे.-डॉ. अमेय पांगारकर, एआयतज्ज्ञ
१) हायटेक तंत्रज्ञान वापरण्यात भाजप आघाडीवर असल्याने यंदा प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चॅटबाॅट येण्याची शक्यता आहे.
२) या माध्यमातून थेट मोदीच बोलत आहेत, त्यांच्याप्रमाणे हावभाव करत आहेत, हे तंत्रज्ञान एआयच्या मदतीने शक्य आहे. पंतप्रधान यांच्या प्री- रेकॉर्डेड भाषणांना होलोग्राममधून मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
राजकीय पक्षासाठी आणि त्या पक्षाच्या नेत्यासाठी लोकांचा कल कसा आहे, जनभावना कोणत्या दिशेने आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. समाजमाध्यमांचा अभ्यास केल्यास, वारे कोणत्या दिशेने वाहते, याची पुसटशी कल्पना येते.
कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी इथपासूनच राजकारण्यांच्या मदतीला येते. लोकांच्या भावनांचे विश्लेषण करणारी काही टूल्स बाजारात आहेत. ‘ब्रॅण्डवॉच’सारखी ही टूल्स सोशल मीडियावर झालेल्या चर्चांमधून, तुम्ही-आम्ही करत असलेल्या पोस्ट्स, कमेंट्समधून जनभावनेचा अचूक अंदाज घेऊन राजकीय पक्षांना सावध करू शकतात.
मतदारांशी संवाद-
गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदारांनी कशा पद्धतीने मतदान केले, याचा अभ्यास करून या निवडणुकीत मतदार नेमका कशा पद्धतीने मतदान करेल, याचे ठोकताळे बांधावे लागतात. विश्लेषण करणारी ‘आयबीएम वॉटसन ॲनॅलिसिस’सारखी काही टूल्स राजकीय पक्षांच्या हाती आली आहेत. ‘चॅटफ्यूएल’ हे टूल सध्या मराठी, गुजराती, हिंदीसह अनेक भाषांमध्ये काम करते. टूलद्वारे राजकीय पक्ष फेसबुक, इन्स्टा, पक्षाची वेबसाइट, व्हॉट्सअप, अशा वेगवेगळया व्यासपीठांद्वारे मतदारांशी संवाद साधता येतो.