संतोष आंधळे, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे दक्षिण मुंबईत आता महाविकास आघाडीसमोर उमेदवार कोण, असा पेच निर्माण झाला आहे.
राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर दक्षिण मुंबईत शिंदेसेना आणि भाजप यांच्याकडून कोणता उमेदवार उभा राहील याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा या पाठोपाठ आता शिंदेसेनेचे यशवंत जाधव यांच्याभोवती चर्चेचा रोख आहे.
दक्षिण मुंबईतील वरळी, शिवडी आणि भायखळा हे तीन मराठीबहुल मतदारसंघ आहेत. मुंबादेवी आणि मलबार हिल या मतदारसंघांमध्ये खेतवाडी, गिरगाव, ठाकूरद्वार, गावदेवी इथेही मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा स्थितीत उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यासमोर मराठी उमेदवार द्यावा म्हणजे गुजराथी, राजस्थानी विरुद्ध मराठी असा संघर्ष टाळता येईल, असे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांचे नाव पुढे येत आहे. पण, त्यांनी खरी शिवसेना कुठली याविषयी विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलेला निवाडा त्यांच्या मार्गातील अडथळा असू शकतो, अशी चर्चा आहे. त्यातच शिंदेसेनेकडून यशवंत जाधव यांचे नाव पुढे येत असले तरी याबाबत ते स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत. पण, ते उभे राहिले तरी त्यांना फुटीर शिवसैनिक म्हणून टीकेचा सामना करावा लागेल.
मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद दोनदा मिळूनही त्यांच्यावर कोणता अन्याय झाला, असा प्रश्न उपस्थित झाला तर अडचण होऊ शकते. त्यामुळेच हेही नाव जाहीर झालेले नाही. भाजपाकडून मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा होती. ते मलबार हिलमधून भरपूर मते घेतील पण कुलाबा, अल्पसंख्याक बहुल मुंबादेवी आणि वरळी, शिवडी, भायखळा या मतदारसंघांमधून त्यांना कसा प्रतिसाद मिळेल याविषयी साशंकता आहे. त्यांच्या नावाची चर्चाही थंडावली आहे.
दक्षिण मुंबईची जागा आमची आहे. त्यामुळे त्या जागेवर आमचाच दावा आहे. त्या ठिकाणी भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची नावे चर्चेत असली तरी त्या ठिकाणी आमदार यशवंत जाधव यांनीसुद्धा काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील.- संजय शिरसाट, आमदार, शिंदेसेना
१९५२ पासून काँग्रेसचा उमेदवार १० वेळा विजयी-
दक्षिण मुंबई मतदारसंघात १९५२ ते २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. तर, दोन वेळा जनता पार्टी, भाजप आणि शिवसेना यांचा उमेदवार विजयी झाला आहे. तर, एकदा संयुक्त सो. पार्टीचा उमेदवार निवडून आला आहे.