"आमच्यासाठी ते गुरुजीच; चांगलं काम करत आहेत", पण..; फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:03 PM2023-08-02T14:03:56+5:302023-08-02T14:08:02+5:30
फडणवीसांनी संभाजी भिडे यांच्या अमरावतील भाषणाचा मुद्दा सभागृहात सांगितला. तसेच, त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई - राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी सभागृहात संभाजी भिडे यांच्या विधानावरुन आक्षेप घेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी लक्षवेधी मांडली. तसेच, संभाजी भिडेंवर काय कारवाई केली, असा सवालही विचारला होता. सभागृहात आज संभाजी भिडेंचा मुद्दा चर्चेला होता. त्यावर, विधानसभा अध्यक्षांनी हा उपरोक्त मजकूर नोंद करुन घेतल्याचे सांगितले. तसेच, याप्रकरणी कार्यवाहीचे आदेशही देण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी निवेदनच वाचून दाखवतो, असे म्हणत केलेल्या कारवाईची माहिती दिली. यावेळी, संभाजी भिडेंचा उल्लेख करताना त्यांनी गुरुजी हा शब्दप्रयोग केला होता. त्यास काही सदस्यांनी आक्षेप घेतला.
फडणवीसांनी संभाजी भिडे यांच्या अमरावतील भाषणाचा मुद्दा सभागृहात सांगितला. तसेच, त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, आम्ही त्यांना गुरुजी म्हणणार, असेही यावेळी स्पष्ट केले. ''संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये एक भाषण केलं, त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले आणि त्यातील आशयावरुन काही कमेंट केल्या आहेत. डॉ. एक. के नारायणचार्य आणि घोष यांची ही दोन पुस्तके आहेत, ते काँग्रसेचे नेते आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे गुरुजी यांनी सहकाऱ्यामार्फत उद्गृत केला. त्या पुस्तकाचे नाव द कुराण अँड द फकीर'' असल्याचे फडणवीसांनी निवेदन वाचताना सांगितले. तसेच, अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात, २९ जुलै रोजी संभाजी भिडे गुरुजी व दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, असेही फडणवीसांनी सांगितले. त्यावेळी, काही विधानसभा सदस्यांनी 'गुरुजी' म्हणण्यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर, ते आम्हाला गुरुजी वाटतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
''काय अडचण आहे, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. संभाजी भिडे यांना सीआरपीसी ४१ अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना नोटीस बजावली आहे. ती त्यांनी स्वीकारली. अमरावती येथील सभेचे व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. माध्यमात जे फिरत आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे, त्यांचे व्हाईस सॅम्पल घेण्यात येईल, असेही अमरावती पोलिसांनी सांगितले आहे.''
#थेटप्रसारण
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 2, 2023
मुंबई येथे होत असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या #पावसाळीअधिवेशन2023 मधील #विधानसभा कामकाज पाहा...#MonsoonSession2023#LIVEhttps://t.co/N0jC72L79r
''मी या सभागृहात पुन्हा सांगतो, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्त्वाकरता काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या गडकिल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात, हे कार्य चांगलं आहे. तरीही त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. कोणालाच असा अधिकार नाही. कोणीही महापुरुषांवर अशा प्रकारचे वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई होईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. तसेच, वीर सावरकर यांच्यावरही आक्षेपार्ह लिखाण केलं जात आहे, काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रात लिहलं होतं की, वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलिंगी होते. ते स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. त्यामुळे, या शिदोरीवरही गुन्हा दाखल करण्यात येईल,'' असेही फडणवीसांनी विधानसभेत निवेदन देतेवेळी सांगितले.